सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२५
दिवसेंदिवस निर्सग संपदा झपाट्याने कमी होत चालली आहे. यामागील कारण म्हणजे दररोज शेकडो एकर शेतजमिनीचे बिगरशेतीत रुपांतर त्याठिकाणी उभे रहाणारे कारखाने, सिमेंटची जंगले, मोठमोठे रुंद रस्ते, मोठमोठे प्रकल्प, राखीव जंगलात दिवसेंदिवस वाढत चाललेलं अतिक्रमण तसेच शेतकरी वर्ग व इतर लोक थोड्याशा पैशांसाठी हिरव्यागार वृक्षांची विक्री करत आहेत.
यामुळे वनसंपदा झपाट्याने कमी होत चालली असून यामुळे जंगली श्वापदे मानव वस्तीकडे वळत आहेत, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून हवेतील ऑक्सिजन व वातावरणावरील ओझोन वायुचा स्थर कमी होत चालला असल्याने निसर्गाचा समतोल झपाट्याने ढासळत चालला आहे. ह्या सर्व समस्या थांबवण्यासाठी शासनामार्फत दरवर्षी करोडो रुपये खर्च करुन वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन करण्यासाठी धडपडत करत असतांनाच दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड केली जात आहे.
असाच काहीसा प्रकार जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यात सुरु असून या तिघेही तालुक्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची विनापरवानगी दिवसाढवळ्या, राजरोसपणे स्वयंचलित यंत्राच्या साह्याने कत्तल करुन दिवसाढवळ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर बिनधास्तपणे वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातील वाडी येथील एका लाकूड व्यापाऱ्याने (विरप्पनने) सोयगाव तालुक्यातील जरंडी व इतर गावांतील तसेच पाचोरा तालुक्यातील सार्वे, पिंप्री, वडगाव कडे, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, वरसाडे, कोल्हे, अटलगव्हान या गावांच्या राखीव जंगलातील व शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतातील हिरव्यागार वृक्षांची कत्तल करुन ही लाकडे ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर मधुर ताडपत्रीने झाकून रात्रीच्या वेळी धुळे, शेंदुर्णी याठिकाणी पाठवत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
ही वृक्षतोड थांबण्यासाठी निसर्गप्रेमींनी व सुज्ञ नागरिकांनी वारंवार आवाज उठवला परंतु संबंधित वनविभागाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने आजही दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने लाकूड व्यापारी व वनविभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचे साटेलोटे आहे की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला असून अशीच वृक्षतोड सुरु राहिल्यास मानवजातीला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल याबाबत तिळमात्र शंका नाही.