विना परवानगी घेण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर बंदी घालावी, सुज्ञ नागरिकांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२५
सद्यस्थितीत पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात क्रिकेटची खेळाची आवड असलेल्या तरुणांची व अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने आता पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात क्रिकेटचे सामने भरवले जात असल्याचे दिसून येत आहे.
परंतु या सामन्यांचे आयोजन करतांना व सामने खेळवतांना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने बऱ्याच वेळा खेळाडूंना चेंडू किंवा बॅट लागुन दुखापत होते यावरुन किंवा बऱ्याच वेळा निर्णय देतांना दोघ संघांमध्ये मतभेद होऊन शाब्दिक चकमक होऊन भांडणतंटे होतात व बऱ्याच वेळा यातूनच संघर्ष वाढत जाऊन हाणामारीत रुपांतर होऊन या हाणामारी करतांना बऱ्याच वेळा क्रिकेटचे स्टंप, बॅट व क्रिकेट खेळत असलेल्या ग्राऊंडवर (स्टेडियमवर) पडलेले दगडगोटे, आसपास पडलेल्या लाकुड, फाट्याचा वापर केला जाऊन एकमेकांवर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अशा घटना घडल्यानंतर कुणाचे डोके फोडले जाते तर कुणाचे दात पाडले जातात किंवा गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्या गावपरिसरात तणाव निर्माण होऊन शांतता भंग होते मग कधी, कधी दोन जमाव आमनेसामने उभे राहतात मग ही बाब पोलीसांपर्यत गेल्यावर क्रिकेट सामने कुणी घेतले होते, खेळणारे खेळाडू कोण होते हे माहीत नसल्याने शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीसांची होणारी पळापळ व इतर समस्या निर्माण होतात. म्हणून अशा विनापरवानगी भरवण्यात येणारे क्रिकेटचे सामन्यावर (टुर्नामेंट) बंदी घातली जावी अशी मागणी गावागावांतील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
म्हणून या अनाधिकृतपणे घेण्यात येणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर बंदी घालण्यासाठीची जबाबदारी प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्यावर सोपवण्यात यावी व ज्या, ज्या गावात ज्या, ज्या ठिकाणी असे विनापरवानगी क्रिकेट सामने घेण्यात येत असतील त्याठिकाणी जाऊन आयोजक, खेळाडू व यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस देणारांवर पोलीसांची मदत घेऊन कारवाई करण्यात यावी म्हणजे असे विनापरवानगी क्रिकेट सामने भरवले जाणार नाहीत व कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही असे मत जनमानसातून व्यक्त केले जात आहे.