प्रवासी निवारा पाडल्याने कुऱ्हाड येथील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय, अपघात होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काल दिनांक २८ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला होता. हे अतिक्रमण काढतांना कशाचाही विचार न करता प्रवासी निवारा पाडल्याने आज कुऱ्हाड येथील बाहेरगावी शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना तसेच लहानथोरांसह सर्वच प्रवाशांना भररस्त्यावर उन्हातान्हात उभे रहाण्याची वेळ आली आहे.
तसेच एस. टी. प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्याबद्दल कुणाचीही तक्रार नसतांना हा प्रवासी निवारा पाडल्याने कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत कारण ज्याठिकाणी भररस्त्यावर प्रवासी उभे रहातात त्याच ठिकाणी कुऱ्हाड गावातून बाहेर जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता, पाचोरा ते लोहारा रस्ता, वरखेडी ते लोहारा रस्ता असा रस्त्यांचा त्रिवेणी संगम असल्याने याठिकाणी वळणदार रस्त्यावर प्रवासी उभे रहात असल्याने एखाद्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्याच ठिकाणी अगोदर होता तसाच प्रवासी निवारा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधून मिळावा अशी मागणी केली जात आहे.
प्रवासी निवारा बांधून न दिल्यास होणाऱ्या परिणामांना कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत जबाबदार राहील व विनापरवानगी प्रवासी निवारा का पाडण्यात आला याची चौकशी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन कुऱ्हाड खुर्द ग्रामस्थ आज नामदार मा. गिरीश भाऊ महाजन मा. आमदार किशोर आप्पा पाटील, मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार, मा. सार्वजनिक बांधकाम विभाग, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळगाव हरेश्वर यांच्याकडे देणार असून त्वरित प्रवासी निवारा बांधून न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.