कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा, परंतु बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची कत्तल केल्याने सुज्ञ नागरिकांनी घेतला आक्षेप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरात तसेच लोहारा व पाचोरा रस्त्यावर दुतर्फा अनेक व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन त्याठिकाणी वेगवेगळे व्यवसाय सुरु केले होते. तसेच काही लोकांनी अतिक्रमण हा करुन त्या जागेवर सट्टा, गावठी व देशी दारुची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरु केली होती. यामुळे बसस्थानक परिसरात वर्दळ वाढल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अवैध धंदे सुरु असल्याने याठिकाणी दिवसभर सटोडी व दारुड्यांची यात्राच भरत होती. यामुळे सकाळी शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना, कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना व शेतात जाणाऱ्या कुऱ्हाड येथील महिला, पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. म्हणून हे अतिक्रमण काढणे गरजेचे होते.
म्हणून ही समस्या सोडविण्यासाठी ०१ मे १९६२ ग्रामपंचायत स्थापनेनंतर मागील बऱ्याच वर्षांपासून अतिक्रमण काढण्याची मागणी केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कविताताई महाजन व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमताने अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी ठराव मंजूर करुन घेत ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन यांच्यामार्फत अतिक्रमण धारकांना वारंवार लेखी व तोंडी सुचना देऊनही अतिक्रमण धारक जुमानत नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन यांनी कागदपत्रांची पूर्तता करुन न्यायालयीन व इतर विभागाकडून रितसर परवानगी घेऊन आज दिनांक २८ जानेवारी २०२५ मंगळवार रोजी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविण्यात आली असून बसस्थानक परिसर व मुस्लिम वस्ती अतिक्रमण मुक्त झाल्याने मोकळा श्वास घेतला आहे.
ही अतिक्रमण निर्मूलन मोहिम कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. कविताताई महाजन, उपसरपंच कौतीक पाटील, ग्रामपंचायत सदस्य अशोक देशमुख, जमील कहाकर, रमेश मुके, समाधान पाटील, इमरान कहाकर, अशोक बोरसे, अरुण बोरसे, जगदीश तेली, सुधाकर महाजन, माजी सरपंच संतोष चौधरी व गावकऱ्यांचे लाभलेले पाठबळ व ग्रामविकास अधिकारी रमेश महाजन यांनी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साहेबांनी दिलेल्या बंदोबस्तामुळे यशस्वी झाली आहे.
ही अतिक्रमण मोहीम राबवतांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, अमोल पाटील, नामदेव इंगळे, शैलेश चव्हाण, अतुल पाटील व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
***************************************************
ब्रेकिंग न्यूज.
***************************************************
जो हेतू डोळ्यासमोर ठेवून आज कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला याबाबत कुऱ्हाड खुर्द गावातून सरपंच सौ. कविताताई महाजन यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. परंतु हे अतिक्रमण काढतांना सरपंच पती प्रदिप महाजन यांनी लुडबुड करत बसस्थानक सुध्दा पाडले यामुळे कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक येथील बाहेरगावी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची व प्रवाशांनी गैरसोय झाली असल्याचे मत कुऱ्हाड गावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
तसेच याच बसस्थानक परिसरात असलेले प्रवेशव्दार व महाकाय हिरव्यागार वृक्षांबाबत कोणत्याही प्रकारची अडचण किंवा कुणाचीही तक्रार नसतांना ही हिरव्यागार वृक्षांची हकनाक कत्तल केली असल्याने कुऱ्हाड येथील सुज्ञ नागरिकांनी या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून काही सुज्ञ नागरिक बेकायदेशीररित्या पाडण्यात आलेले बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची हकनाक केलेली कत्तल याबाबत संबंधित विभागाकडे रितसर तक्रार दाखल करुन कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूजकडे कथन केली आहे.
****************************************************
काय होईल ते पाहून घेऊ, सरपंच पती प्रदीप महाजन
****************************************************
दिवसभर अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरु असतांनाच बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची हकनाक केलेली कत्तल याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूजकडे तोंडी कैफियत मांडली होती. याबाबत सविस्तर खुलासा घेण्यासाठी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून सरपंच सौ. कविताताई यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून खुलासा घेण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित संपर्क क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवर सरपंच पती प्रदीप महाजन यांनी संवाद साधला तेव्हा त्यांना बसस्थानक का पाडले ? व हिरव्यागार वृक्षांची हकनाक कत्तल का केली ? अशा तक्रारी कुऱ्हाड खुर्द येथील सुज्ञ नागरिक करत आहेत याबाबत खुलासा मागितला होता.
हा खुलासा मागितला असता आम्ही बसस्थानक पाडले नाही व आम्हाला योग्य वाटले म्हणून आम्ही हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली आहे. कुणाला काय करायचे ते करु द्या आम्ही पाहून घेऊ अशा शब्दात उत्तर दिले असल्याने यांच्या बोलण्यामुळे ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ ही म्हण खरी ठरते. असे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुऱ्हाड खुर्द बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची कत्तल केल्याने या परिसरातील सावली हिरावली गेली आहे. तसेच कुऱ्हाड खुर्द ते पाचोरा तसेच कुऱ्हाड बसस्थानक ते लोहारा रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यासाठी सीमारेषा आखण्यात आली होती.
मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले व उर्वरित अतिक्रमण जैसे थे ठेवण्यात आले असल्याने अतिक्रमण धारक व सुज्ञ नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे.