आजच्या प्रगत युगातही अंधश्रद्धेचे भुत कायम, शेवाळे गाव शिवारात करणी कवटाळचा प्रयोग.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२५
प्रत्येकाची कशावर तरी, कोणावर तरी श्रध्दा असतेच कारण श्रध्दा ही मानवाच्या रुक्ष जीवनातील हिरवळ आहे. श्रध्दाळू असणे तर गैर नाही. कारण कोणतेही काम श्रद्धापूर्वक केले तर ते सफल होण्याची, यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. मग ती श्रद्धा परमेश्वरावरील असो, माता, पिता व वडीलधाऱ्या मंडळीवरील असो किंवा गुरु, साधू संत यांच्यावरील असो, श्रद्धा तुम्हाला शक्ती देत असते, तुमचे सामर्थ्य बनत असते. श्रद्धेमुळे आत्मविश्वास वाढतो व या आत्मविश्वासामुळेच काम करण्यासाठी दुप्पट बळ मिळते व हाती घेतलेली कामे यशस्वी होवू शकतात.
परंतु हीच श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेकडे झुकते तेंव्हा विनाशाकडे वाटचाल सुरू होते. कारण अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या निखाऱ्यावरील राख आहे. ही राख झाडत असताना हाताला चटका बसण्याची दाट शक्यता असते किंवा निखारा विझण्याची शक्यता असते कोणतीही गोष्ट सबळ पुराव्याशिवाय स्विकारणे म्हणजेच अंधश्रद्धा होय. व याच अंधश्रध्देत असल्यावर आपली सगळी कामे ईश्वर कृपेने आपोआप व्हावीत असे वाटू लागते व त्यातूनच तथाकथित बाबा, बुवा यांच्यात समाजाचे शोषण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते व पुढे चालून यातुनच नको, नको त्या घटना घडतात असा अनुभव येतो व येत आहे.
अशाच काही अंधश्रद्धा पसरवणाऱ्या घटना आजपर्यंत घडल्या आहेत. यात १९९५ साली सप्टेंबर महिन्यात अंधश्रध्देला पूर आला व यातुनच मुंबईत माहिमच्या समुद्राच पाणी गोड झाल्याची बातमी पसरली ही बातमी पसरताच माहिमच्या खाडीकिनारी एकच गर्दी झाली होती. लोक अक्षरशः वेड्यासारखे समुद्रातील पाणी घराघरात पीत होते, लहान मुलांना पाजत होते हा बाबा मगदूम शहांचाच चमत्कार असल्याचे एकमेकांना सहर्ष सांगत होते. याचवेळी महापालिका प्रशासनाने हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले होते तरीही अंधश्रध्देचे वारे अंगात संचारलेल्या मुंबईकरांनी बाटल्या भरभरून ते घाण पाणी मोठ्या श्रद्धेने अमृत समजून घेतले होते.
हा प्रकार येथेच थांबतो असे नाही आजही कुणाला सर्पदंश झाल्यास त्या सर्पदंश झालेल्या इसमाच्या कानशिलात एक थप्पड मारली की सर्पाचे विष उतरते असा दावा करणारे तसेच पोटावरून हात फिरवला म्हणजे पुत्रप्राप्ती होते, हातात, गळ्यात किंवा दंडावर धागा, दोर, तावीत बाधणे, अंगावरुन लिंबू उतरवून तो कापून फेकणे, लिंबा मध्ये सुया टोचून, कणकेचे गोळे, बाहुली बनवून पुजा, अर्चा करुन अघोरी उपाय करुन हजारो भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूक करुन हजारो नव्हे तर लाखो रुपये कमाई करणाऱ्या भोंदूबाबांची दुकानदारी अजूनही खुलेआम सुरु असून हा प्रकार आपण उघड्या डोळ्यांनी पहात आहोत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील वाडी येथुन जवळच असलेल्या शेवाळे गावात व शिवारात घडत असून या शेवाळे गाव, शिवारात ठिकठिकाणी खण, नारळ, कोरी साडी, अगरबत्ती, हळदीकुंकू, लिंबू, भिलावा, सुया, असे पुजेसाठी लागणारे साहित्य आढळून येत असल्याने शेवाळे गावात याबाबत संभ्रम निर्माण झाला असून अंधश्रद्धा पसरवून जनमानसात भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ईसमाचा शोध घेऊन संबंधितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
***************************************************
अरुण पाटील पोलीस पाटील वाडी शेवाळे.
***************************************************
हा गैरप्रकार खोडसाळ पणाचा असून असे करणी कवटाळ केल्याने काहीच होत नाही म्हणून कुणीही घाबरुन जाऊ नये तसेच जो कुणी हा असा गैरप्रकार करत असेल त्यांनी हा गैरप्रकार बंद करावा अन्यथा हा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधिताचा शोध घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाडी गावच्या पोलीस पाटील अरुण पाटील यांनी दिला आहे.