३१ हजारांच्या पुढे लोकवस्तीच्या गावात, ग्रामसभा घेतली चार भिंतींच्या आत. कोंबड झाकल तरी तांबड फुटणारच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०१/२०२५
काल दिनांक २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी आपला ७६ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंतु हा प्रजासत्ताकदिन साजरा करत असतांना खरच प्रजा सुखी आहे का ? प्रजेला योग्य न्याय मिळतो आहे का ? या मिळालेल्या स्वातंत्र्याचा व लोकशाहीचा खराखुरा हक्क व आनंद खरच लोकांना मिळतो आहे का ? की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण फक्त १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी व २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी कुठेतरी जाऊन फक्त आणि फक्त राष्ट्रीय ध्वजारोहण करुन मानवंदना देणे हाच आमचा अधिकार व स्वातंत्र्य आहे की काय असा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
असाच काहीसा प्रकार काल दिनांक २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी पाचोरा तालुक्यातील ३१ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव हरेश्वर गावात घडला असून इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. मात्र लोकसंखेचा विचार करता ही ग्रामसभा योग्य ठिकाणी म्हणजे जेथे दिड ते दोन हजार लोक बसतील अशा ठिकाणी ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करुन घेणे आवश्यक होते. परंतु ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सरपंच व सदस्यांनी फक्त आणि फक्त ठरल्याप्रमाणे किंवा ठरवून दिल्याप्रमाणे ग्रामसभा घेण्यात आली असा देखावा तयार केला असा आरोप पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांनी केला आहे.
***************************************************
दिव्याखाली अंधार, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी फरार.
***************************************************
काल दिनांक २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी पिंपळगाव हरेश्वर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंचासह १७ पैकी १७ असे एकूण १७ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र ग्रामसभा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचून या समस्यांचे निराकरण कधी करणार याबाबत व इतर अडचणींबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरु केली यामुळे व पिंपळगाव हरेश्वर गावातील वाढते अतिक्रमण हा मुद्दा पुढे येणार असल्याचे पाहून १७ पैकी १२ पदाधिकाऱ्यांनी या ग्रामसभेतुन काढता पाय घेतला व दांडी मारली असल्याची अशी माहिती समोर येत आहे .
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पिंपळगाव हरेश्वर गावात सट्टा, पत्ता, जुगार, चक्री नावाचा ऑनलाईन गेम म्हणजे (सट्टा), गावठी व देशी दारुची हे अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत चालले असून अल्पवयीन, मुले तरुण वर्ग व म्हातारे अर्क या व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून कित्तेक कुटुंब बर्बादीच्या मार्गावर आहेत याकडे सरपंच व सदस्य जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा ठपका आहे.
तसेच पिंपळगाव हरेश्वर गावातील अगोदर झालेले अतिक्रमण व दिवसागणिक वाढत चाललेल्या अतिक्रमणाचा मुद्दा या ग्रामसभेत वादळी ठरणार होता व स्वता ग्रामपंचायतीचे सरपंच पती व इतर सदस्यांनी अतिक्रमण केले असल्याने तसेच गावात पक्की घरे असल्यावरही पदाचा दुरुपयोग करुन गावठाण जमीनीवर भोगवटा लावून घेत जागा हडप केली आहे असल्याने त्यांनी ग्रामसभेतुन पळ काढला असावा अशी जोरदार चर्चा संपूर्ण पिंपळगाव हरेश्वर गावात ऐकावयास मिळत आहे.
तसेच गावातील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा चांगला आहे कारण या शाळेतील शिक्षक अध्यापनाकडे जातीने लक्ष देतात परंतु ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाच्या संस्थेच्या वादात संस्थेचे अध्यक्ष गुरफटले असल्याने शिक्षकवर्ग संभ्रमात आहेत यामुळे या ज्ञान मंदिरात शैक्षणिक दर्जा खालावला आहे. म्हणून याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच पिंपळगाव हरेश्वर गावात कार्यरत असलेले मराठी शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक, ग्रामविकास विद्यालयाचे संचालकांची मुले, मुली पिंपळगाव हरेश्वर येथील शाळेत शिकली पाहिजे अशी अपेक्षा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे पिंपळगाव हरेश्वर या गावात इतिहासकालीन मंदिरे असल्याने प्रती पंढरपूर म्हणून या गावाची ओळख असून चतुर्थी व एकादशीला बरेचसे भाविक येतात म्हणून या दिवशी मांसविक्रीवर बंदी घातली जावी, योग्य लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, दिव्यांग बांधवांना करसवलत, घरकुल योजनेचा लाभ, स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, बोगस रहिवाशांची चौकशी करुन त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसुल करुन बोगस लाभार्थ्यांना लाभ देणे थांबवून योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
तसेच मागील काही वर्षांपासून राममंदिर उभारण्यासाठी जागेची मागणी केली जात आहे परंतु अद्यापही जागा उपलब्ध करुन दिली नसल्याने राममंदिरासाठी त्वरित जागा उपलब्ध करुन द्यावी, सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात यावे, पिंपळगाव हरेश्वर गावातील शासनमान्य देशी दारुचे दुकान व बिअर बार व सर्व प्रकारचे अवैध धंदे सकाळपासून अहोरात्र, चोवीस तास सुरु असतात, याठिकाणी अल्पवयीन मुलांना दारु दिली जाते, ड्राय डे च्या दिवशी सुध्दा देशी दारुचे व बिअर बार व अवैध धंदे खुलेआम सुरु असतात ते बंद करणे हे महत्त्वाचे विषय या ग्रामसभेत मांडण्यात येणार होते परंतु ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच ग्रामसभेकडे पाठ फिरवली व एका बंदिस्त घरात ग्रामसभा घेण्यात आल्यामुळे पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
विशेष म्हणजे पिंपळगाव हरेश्वर गावात अतिक्रमण वाढत चालले असून ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करुन घेत स्वता अतिक्रमण केले असल्याने तसेच गावात स्वत्वाची पक्की घरे असल्यावरही गावठाण जागेवर भोगवटा लावून घेत जागा हडप केली असल्याने हा मुद्दा या ग्रामसभेत उपस्थित केला जातो की काय ? व आपले पितळ उघडे पडते कि काय ? या भितीने ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसभेला दांडी मारली आहे मात्र ग्रामसभा संपल्यानंतर अनुपस्थित पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेच्या प्रोसिडींग बुकात स्वाक्षऱ्या करुन आम्ही ग्रामसभेला हजर होतो असा बनाव केला जाऊ शकतो असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
***************************************************
खुल्या मैदानात ग्रामसभा घेण्याची मागणी.
***************************************************
खुल्या मैदानात ग्रामसभा घेण्याची मागणी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांनी केली आहे कारण या ग्रामसभेत आपल्या समस्या मांडण्यासाठी व नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या एका खोलीमध्ये म्हणजे (चार भिंतींच्या आत) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याने व ग्रामस्थांची संख्या जास्त असल्याने या खोलीमध्ये एकच गर्दी झाली होती म्हणून सगळ्यांना प्रवेश न मिळाल्याने काही ग्रामस्थांनी दरवाजे व खिडक्यांमधून डोकावून ग्रामसभेत सहभाग नोंदवला विशेष म्हणजे जास्त गर्दी झाल्याने व ध्वनिक्षेपकाची व्यवस्था नसल्याने या खोलीत चाललेल्या ग्रामसभेत कोण काय म्हणतंय हे काहीच समजत नसल्याने बऱ्याचशा ग्रामस्थांनी निराश होऊन काढता पाय घेतला.