पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. येथून दिड लाख रुपये किंमतीच्या सहा गुरांची चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथून जवळच असलेल्या सांगवी प्र. लो. येथील शेतकरी भाऊसाहेब अनंतराव (आनंदा) पाटील यांच्या सांगवी प्र. लो. ते वरखेडी रस्त्यावर असलेल्या शेतातील पत्र्याच्या शेडचे कुलुप तोडून दोन बैल, दोन गायी व दोन वासरांची चोरी झाल्याची बाब आज सकाळी भाऊसाहेब पाटील हे शेतात गेल्यावर लक्षात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथून जवळच सांगवी प्र. लो. हे गाव असून या गावातील शेतकरी भाऊसाहेब अनंतराव पाटील याची सांगवी प्र. लो. रस्त्यावर शेतजमीन असून याच शेतात त्यांनी शेती उपयोगी अवजारे व गुरेढोरे बांधण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. दररोज प्रमाणे भाऊसाहेब पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर शेतात काम केले व संध्याकाळी दोन बैल, दोन गायी व दोन वासरांना चारापाणी करुन ही गुरे पत्र्याच्या शेडमध्ये बांधून शेडला कुलुप लावुन घराकडे निघुन गेले होते.
आज दिनांक २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी सकाळी भाऊसाहेब पाटील हे गुराढोरांना चारापाणी करण्यासाठी आले असता त्यांना पत्र्याच्या शेड उघडे सताड दिसून आले. म्हणून त्यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले असता शेडमध्ये बांधलेले दोन बैल, दोन गायी व दोन वासरे खुट्यावर दिसून आली नाहीत. म्हणून त्यांनी बारकाईने पाहिले असता गुराढोरांच्या गळ्यातील अर्धवट कापलेले दोरखंड व घंट्या जागेवर पडलेल्या दिसून आल्याने आपली गुरे चोरीला गेल्याचा संशय आला म्हणून त्यांनी शेतात इतरत्र फिरुन पाहाणी केली असता जवळच चारचाकी वाहनाच्या टायरचे ठसे व त्याठिकाणी उकरलेली माती दिसून आल्याने आपली गुरे चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी ही घटना ग्रामस्थांना सांगितली.
यानंतर भाऊसाहेब पाटील हे ग्रामस्थांना सोबत घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर येत असून याच सांगवी प्र. लो. शेत शिवारातून मागील सहा महिन्यांपूर्वी दोन म्हशींची चोरी झाल्याची घटना घडली होती. व आता पुन्हा सहा गुरांची चोरी झाल्याची घटना घडली असल्याने शेतकरी व पशुधन पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून ही गुरे चोरी करणारी टोळी आसपासच्या गावातील असावी किंवा कुणीतरी बाहेरच्या लोकांना बोलावून त्यांचा मदतीने गुरे चोरी करत असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
****************************************************
या चोरीचा तपास होणे गरजेचे भाऊसाहेब पाटील.
****************************************************
पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावातून पशुधन चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत व आजही घडत आहेत म्हणून या गुरे चोरीच्या घटनांची काटेकोरपणे चौकशी करुन या गुरे चोरी करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केला पाहिजे. तसेच माझ्या शेतातील गुरांची चोरी ही २५ जानेवारी शनिवार ते २६ जानेवारी रविवार रात्री एक वाजेपासून ते सकाळी तीन वाजेदरम्यान झाली असावी असा माझा अंदाज असून या कालावधीत सांगवी प्र. लो ते वरखेडी, पाचोरा, लोहारा व इतर रस्त्यावरुन कोणकोणती वाहने गेली तसेच या कालावधीत या परिसरात काही भ्रमणध्वनी वापरले गेले असतील तर त्यांचा तपशील काढण्यात यावा म्हणजे चोरी उघडकीस येण्यास मदत होईल असे मत पशुधन पालक भाऊसाहेब पाटील व सांगवी प्र. लो. येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.