पिंपळगाव हरेश्वर गावात अतिक्रमण होत असल्याची बोंबाबोंब, परंतू पदाधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या अतिक्रमणाचे काय ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावात श्री. गोविंद महाराज मंदिर, श्री. विठ्ठल मंदिर, श्री. साईबाबा मंदिर, हनुमान मंदिर, श्री. हरिहरेश्वर मंदिर, ही देवस्थाने, ग्रामविकास माध्यमिक शिक्षण संस्था, मराठी मुलांची शाळा, मुकबधीर शाळा, शासकीय रुग्णालय, पोलीस स्टेशन, मोठ्या प्रमाणात मोसंबी पिकवली जात असल्याने पिंपळगाव हरेश्वर येथील मोसंबी बाहेर राज्यात व विदेशात जात असल्याने मोसंबीची मोठी बाजारपेठ असून श्री. हरिहरेश्वर मंदिर असल्याने प्रति पंढरपूर म्हणून या पिंपळगाव हरेश्वर गावाची ओळख आहे.
अशाच या गावात दर एक ते दोन महिन्यांत नवनवीन विषय समोर येतात व यातुनच काही दिवस या विषयांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होते मग ज्या विषयावर चर्चा केली जाते तो विषय मार्गी लावण्यासाठी कुणीतरी सच्चा समाजसेवक पुढे येतो परंतु अशातच चुकीच्या कामांची पाठराखण करुन स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी या विषयांचे भांडवल करणारा कुणीतरी एखादा (महागुरु) पुढे येतो व सच्चा समाजसेवकाला चुप बसवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून आहे त्या विषयाला बगल देऊन तो विषय थांबवला जातो असा अनुभव पिंपळगाव हरेश्वर येथील नागरिकांना येत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे.
अशातच मागील पंधरा दिवसांपासून ग्रामविकास माध्यमिक विद्यालय, पोलीस स्टेशनकडे जाणारा रस्ता, बसस्थानक ते सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता, मराठी मुलांच्या शाळेसमोर रस्त्यावर स्वसंरक्षण भिंतीजवळ नव्याने होत असलेले तसेच पिंपळगाव हरेश्वर या गावातील गल्लोगल्लीबोळात दिवसागणिक वाढत चाललेले अतिक्रमण याबाबत जोरदार चर्चा सुरु असून हे वाढते अतिक्रमण रहदारीला तसेच इतर काही कारणांमुळे त्रासदायक ठरणार असल्याचे मत काही सुज्ञ नागरिकांनी विशेष करुन शाळेत येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे.
तसेच याबाबत पिंपळगाव हरेश्वर येथील काही सुज्ञ ग्रामस्थांनी आक्षेप घेतला असून या अतिक्रमणामुळे भविष्यात ग्रामविकास विद्यालय, मराठी मुलांची शाळा, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालय, बसस्थानक ते पाचोरा या दळणवळणाच्या मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण होईल म्हणून हे होणारे अतिक्रमण त्वरित थांबवून तसेच याअगोदर करण्यात आलेले संपूर्ण अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पावले उचलली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
**************************************************
सुरक्षितता बेरोजगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून मिळावेत.
**************************************************
पिंपळगाव हरेश्वर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून या गावातील शेकडो मुलामुलींनी चांगले शिक्षण घेतले आहे. मात्र कुठेच नोकरी लागत नसल्याने तसेच कुठेही कायमस्वरूपी उद्योग मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी बिकट परिस्थितीत झाली असून अल्पसे भांडवल उभारुन शिंपी, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीक उपकरणे विक्री व दुरुस्ती, जनरल स्टोअर्स, किराणा दुकान, चहाची टपरी असे विविध उद्योगधंदे करण्यासाठी स्वताजवळ जागा उपलब्ध नसल्याने ज्या रस्त्यावर किंवा परिसरात व्यवसायाला चालना मिळेल अशा ठिकाणी टपरीवजा दुकाने उभारुन काहींनी त्याठिकाणी आपले व्यवसाय सुरु केले आहेत तर काही तरुण आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करुन या सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पिंपळगाव हरेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला आमचे व्यवसाय सुरु करण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
***************************************************
खुद्द पदाधिकार्यांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी.
***************************************************
आजच्या परिस्थितीत होत असलेल्या अतिक्रमणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा सुरु असून पिंपळगाव हरेश्वर येथील एका परिसरात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत काही सुज्ञ नागरिक पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु गावातील अतिक्रमण हटवणे किंवा होणारे अतिक्रमण थांबवणे हा विषय ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असल्याने ज्यांना, ज्यांना हे अतिक्रमण काढण्याची मागणी करायची आहे त्यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत हा विषय घेऊन तसा ठराव मंजूर करुन योग्य पध्दतीने अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत जनमानसातून व्यक्त केले जात आहे.
परंतु अतिक्रमण काढण्यासाठी कितीही तक्रारी केल्या तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रितसर कारवाई केली जाणार नसल्याचे सांगितले जात असून यामागील कारण म्हणजे खुद्द ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनीच अतिक्रमण केले असल्याचे जनमानसातू ऐकावयास मिळत असून गावातील अतिक्रमण काढण्याअगोदर ज्या, ज्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांचे अतिक्रमण अगोदर काढण्यात येऊन त्यांना पदावरुन पायउतार करण्यात आले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.