अंबे वडगाव शेत शिवारात व शासकीय भूखंडावर जे. सी. बी. मालकांचा धिंगाणा, गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२५
पाचोरा येथे अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, वडगाव जोगे, कोकडी तांडा, कोल्हे, मालखेडा परिसरात जे. सी. बी. मालकांनी धिंगाणा घातला असून हे जे. सी. बी. मालक फुकाचा पैसा कमावण्यासाठी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता महसूल बुडवून गौण खनिज उत्खनन, उचल व वाहतूक करुन दररोज हजारो रुपये कमाई करत आहेत.
यामुळे एकाबाजूला शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून दुसरीकडे गावठाण जमीन, गायराण जमीन, शासकीय भूखंड नष्ट होत चालले असून राखीव जंगलातील गौण खनिजासह वनस्पती नष्ट होत चालली असून ज्या, ज्या ठिकाणाहून जे. सी. बी. च्या साह्याने खोदकाम करुन मुरुम, माती, दगडाची उचल केली जात आहे तेथे मोठमोठे खड्डे व खदाणी तयार झाल्या असून गाय, म्हैस, बैल व शेळ्या या पाळीव जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून या मोठमोठ्या खड्यात पाळीव जनावरे किंवा लहान मुले पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने पशुधन पालक मेटाकुटीला आला आहे.
विशेष बाब म्हणजे हे जे. सी. बी. मालक पैसे कमावण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याचे ऐकून दुसऱ्या शेतकऱ्याचा सामुहिक बांधारा फोडणे, शेतातून वाहणाऱ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलवणे, शेतकऱ्यांच्या सामुहिक बांधावरील मोठमोठे हिरवेगार वृक्ष खोदुन फेकणे, महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन करुन उचल करणे असे प्रकार करत असल्याने शेजारी, शेजारी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भांडणतंटे होऊन याचे हाणामारीत रुपांतर होऊन गाव शिवारात अशांतता निर्माण होत असल्याने या भांडणातून एखाद्यावेळी जीवितहानी होऊ शकते अशी भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हा सगळा गैरप्रकार रोखण्यासाठी गावागावांतील तलाठी, सर्कल व संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन अवैधरित्या होणारे खोदकाम, गौण खनिज उत्खनन, उचल व वाहतूक रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत व शासनाचा बुडणारा महसूल, गाव शिवारातील नष्ट होत चाललेल्या गायराण व गावठाण जमिनी वाचवण्यासाठी तसेच वनविभागाने राखीव जंगलातील खोदकाम थांबवण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.