कापूस व्यापाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे मजुरांचा जीव टांगणीला, मोठ्या अपघाताची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०१/२०२५
सद्यस्थितीत शेतकरीवर्ग आपल्या शेतात पिकवलेला कापूस विक्री करत आहेत. शासनमान्य कापूस खरेदी केंद्रावर योग्य सुविधा नसल्याने कापूस विक्रीसाठी नेला असता आठ, आठ दिवस ताटकळत उभे रहावे लागते तसेच वाहन भाडे भरावे लागते हा खर्च परवडणारा नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी हा खाजगी कापूस व्यापाऱ्यांना कापूस विकून मोळळा होत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे खाजगी कापूस व्यापाऱ्यांची चांदी झाली असून ते शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मातीमोल भावाने खरेदी करत आहे. परंतू ही कापूस खरेदी करतांना गावागावात जाऊन कापूस खरेदी केल्यानंतर तो कापूस वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर, टेम्पो किंवा ट्रकचा वापर करुन या वाहनांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त कापूस भरुन भर रस्त्यावरुन वाहतूक करतांना कापूस मोजमाप करुन तो वाहनात भरतांना जे मजुर असतात त्यांना कापसाच्या भरगच्च भरलेल्या वाहनावर बसवून चुकीच्या पद्धतीने वाहतूक करत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे भरगच्च कापूस भरलेल्या वाहनावर बसून प्रवास करणाऱ्या मजूरांच्या जीविताला रस्त्यावर असलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या डोक्याला लागुन किंवा रस्त्यावरुन वाहन घेऊन जातांना जोरदार ब्रेक लावल्याने कापसाच्या वाहनावर बसलेल्या मजुरांचा तोल जाऊन ते खाली पडून जीवितहानी होऊ शकते हे गाडीवरील बसलेले मजुर बघितल्यावर शंका येते म्हणून अशा बेपर्वाईने कापसाच्या वाहनावर मजुरांची होणारी वाहतूक थांबण्यासाठी कडक पध्दतीने कारवाईचा बडगा उगारला पाहिजे असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
*कारण या अगोदर अशाच कापूस भरलेल्या वाहनावर बसलेल्या मजुरांचा कुठे विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श झाल्याने, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांचा डोक्यात मार लागल्याने किंवा वाहनावरुन पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. म्हणून कापूस व्यापाऱ्यांना मजुर वाहून नेण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यासाठी भाग पाडावे कारण गोरगरिबांना हाताला काम नसल्यामुळे ते मजबूरीखातर आपला जीव धोक्यात घालून काम करतांना दिसून येतात*