घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाचोरा तालुक्यातील एका ग्रामसेवकाने घेतले दहा हजार रुपये.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२५
ग्रामपंचायत म्हणजे छोट्या, छोट्या गावखेड्याचा कारभार पाहणारी ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने पाहिला जातो व ग्रामसेवक हा शासन व जनतेतील महत्वाचा दुवा असतो. परंतू सद्यस्थितीत ग्रामसेवक हा ग्राम+सेवक या शब्दातील सेवक या शब्दाचा अर्थ विसरला असल्याचा अनुभव येत असून जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील गावखेड्यात (काही) ग्रामसेवकांनी धुमाकूळ घातला आहे.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे सरपंच व सदस्यांना अंधारात ठेवून शासनाकडून येणाऱ्या विविध योजना लाभार्थ्यांना देतांना ग्रामसेवक पैसे घेत असल्याचा प्रकार पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे उघडकीस आला असून ग्रामसेवकाने एका घरकुल लाभार्थ्याला घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले असल्याची बाब उघडकीस आली असून या गैरप्रकाराबाबत एका सुज्ञ नागरिकांने ही बाब दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी पाचोरा येथे दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी छेडण्यात आलेल्या आमरण उपोषणस्थळी माजी जिल्हापरिषद सदस्य मा. मधुकर भाऊ काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन कर्त्यांच्या भेटीसाठी आलेले ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सी. ओ. भाऊसाहेब अकलाडे साहेब यांच्या समोर पुराव्यानिशी लक्षात आणून देत चौकशीची मागणी केली होती.
हा गैरप्रकार लक्षात आणून दिल्यावर डेप्युटी सी. ओ. अकलाडे साहेबांनी पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना संबंधित ग्रामसेवकांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत पाचोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याने गावातून नारजी व्यक्त केली जात असून या पैसे घेणाऱ्या कामचुकार ग्रामसेवकाची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.