पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, अवैध दारु विक्रेत्याला पकडले बिल्धी फाट्यावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०१/२०२४
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंद्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला असून मागील आठवड्यात पुरवठा विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वयंपाकाचा गॅस वाहनात भरतांना रंगेहाथ पकडून तीन ठिकाणी कारवाई केली आहे. यामुळे अवैधरित्या गाडीत गॅस भरुन देणारे व गॅस भरुन घेणारांचे धंदे बंद झाल्याने त्यांच्यावर आता स्वतावर ऑक्सिजन गॅस लावण्याची वेळ आली आहे.
याच कालावधीत पाचोरा पोलीसांनी अवैध धंद्याच्या विरोधात कंबर कसली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. अशातच पाचोरा ते जळगाव रस्त्यावर असलेल्या बिल्धी फाट्यावर एक इसम अवैधरित्या देशी, विदेशी व गावठी दारु विक्री करत असल्याने या फाट्यावर रात्रंदिवस दारुड्यांची यात्रा भरते व दिवसभर गोंधळ होत असल्याने या रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो अशी तोंडी तक्रार बिल्धी ग्रामस्थांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती व याठिकाणी या दारु विक्रीने दोन ते तीन जनांनी जीव गमावला असल्याचे लक्षात आणून दिले होते.
या तक्रारीची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बिल्धी फाट्यावर धाड टाकून त्या ठिकाणी भगवान बळीराम जाधव ऊर्फ (भगा) या इसमाला देशी, विदेशी व गावठी दारुची अवैध विक्री करतांना रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कालम ६५ ई प्रेमाणे गुन्हा दाखल करुन मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी, योगेश पाटील व अशोक हटकर यांनी केली असून सदरच्या दारु विक्रेत्यावर पाचोरा पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतत कारवाया केल्या आहेत. मात्र भगवान जाधव हा कुणालाही न जुमानता दिवसाढवळ्या सतत अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येत असून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.