मुक्तानंद गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे, अंबे वडगाव परिसरातील इण्डेण गॅस ग्रहक घरचा ना घाटचा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सीच्या ढिसाळ व मनमानी कारभारामुळे तसेच एजंसीच्या संचालकाच्या मनमानी कारभारामुळे वरखेडी गावासह सावखेडा, लोहारी, अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, वडगाव जोगे, कोकडी तांडा व आसपासच्या गावातील गॅस ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गॅस ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मुक्तानंद गॅस एजन्सी असून या एजन्सी कडून गॅस ग्राहकांना वेळेवर तसेच घरपोच सेवा दिली जात नसल्याने तसेच गॅस सिलिंडर घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली अधिकृत गॅस ग्राहकांकडून ४०/०० ते ५०/०० रुपये अतिरिक्त पैसे वसुल केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी ही वरखेडी येथील स्थानिक व्यक्तीच्या मालकीची होती. परंतू त्यांनी वैयक्तिक अडचणींमुळे ही मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी बाहेर गावच्या दुसऱ्या व्यक्तीला विकली असून ही गॅस एजन्सी घेणाऱ्या संबंधित मालकाकडून गॅस ग्राहकांना योग्य वेळी घरपोच गॅस सिलिंडर मिळत नसल्याने तसेच घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेत असल्याने गॅस ग्राहकांनी नारजी व्यक्त केली आहे.
वास्तविक पाहता गॅस ग्राहकांनी सिलिंडर बुकिंग केल्यानंतर संबंधित एजन्सी कडून २४ तासांच्या आत घरपोच सिलिंडर देऊन गॅस वापरतांना कोणत्याही प्रकारची गॅस गळती होऊन अपघात होऊ नये म्हणून ग्राहकांच्या घरात रेग्युलेटर व्यवस्थीत बसवून, गॅस वाहक रबळी नळी व शेगडी सुस्थितीत आहे किंवा नाही हे काळजीपूर्वक पाहिले पाहिजे असा नियम असल्यावरही वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी कडून या नियमांची पायमल्ली होत असून घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे वसुल केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
*************************************************
अंबे वडगाव परिसरातील इण्डेन गॅस कंपनीचा ग्राहक घरचा ना घाटाचा.
*************************************************
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी जामनेर तालुक्यातील रामसेवा इण्डेन गॅस एजन्सी कडून रितसर गॅस कनेक्शन घेतले होते. या रामसेवा गॅस एजन्सी कडून ग्राहकांना वेळेवर व शासनमान्य दरात घरपोच सेवा दिली जात होती. मात्र मागील वर्षी वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी दुसऱ्या व्यक्तीने घेतल्यानंतर संबंधित गॅस कंपन्यांनीच्या मालकाने अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील रामसेवा इण्डेन गॅस ग्राहकांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता सगळे ग्राहक स्वताच्या गॅस एजन्सी कडे वर्ग करुन घेतले असून आता या मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी कडून ग्राहकांना वेळेवर सिलिंडर दिले जात नसल्याने व घरपोच सिलिंडर दिलेच तर घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे घेत असल्याने वडगाव अंबे परिसरातील इण्डेन गॅस ग्राहकाची परिस्थिती “घरका ना घाटका” अशी झाली आहे.
*************************************************
वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सीची चौकशी करण्याची मागणी.
**************************************************
वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सी बाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून या गॅस एजन्सीची चौकशी करण्यात आली पाहिजे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली असून या मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सीने इण्डेण कंपनीकडून मागविण्यात आलेले एकुण सिलिंडर व विक्री झालेले एकुण सिलिंडर तसेच मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सीच्या अधिकृत गॅस ग्राहकांना त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे म्हणजे ऑनलाईन बुकींग करुन वितरीत करण्यात आलेली सिलिंडर याची गोळाबेरीज केली तर नक्कीच या एजन्सीचा भांडाफोड होईल अशी असे मत व्यक्त केले जात आहे.
विशेष वृत्त ~
पाचोरा येथील पुरवठा विभाग व पोलीस विभागाने पाचोरा शहरात संयुक्तपणे धाडसत्र राबवून स्वयंपाकाचा गॅस वाहनात भरतांना रंगेहाथ पकडून या कारवाईत जवळपास शेकडो सिलिंडर जप्त करण्यात आली असून या जप्त करण्यात आलेल्या सिलिंडर मध्ये वरखेडी येथील मुक्तानंद इण्डेन गॅस एजन्सीची सिलेंडर मिळून आली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून जर हे वृत्त खरे असेल तर या गॅस एजन्सीची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.