रस्त्याच्या नुतनीकरणासाठी येत्या २२ जानेवारीला शेंदुर्णी व सोयगाव येथे रास्तारोको आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०१/२०२५
“रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे फलक रस्त्याच्या बाजूला बघायला मिळतात परंतु हा फक्त एक देखावा असून आजही जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते मराठवाड्यातील सोयगाव तालुक्याला म्हणजेच मराठवाड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ, मोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा असलेला साईट पट्टा खराब झाला असून या शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावर खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा किंवा डांबर दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची वेळ आली असून या रस्त्यावर दररोज अपघात होत असून आजपर्यंत दोन ते तीन वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला असून बऱ्याचशा वाहनधारकांना अपंगत्व व जबर मार लागला असल्याच्या घटना घडल्या आहेत व आजही घडत आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता शेंदुर्णी शहर व सोयगाव हे तालुक्याचे शहर असल्याकारणाने याठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर दररोज मोठ, मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ असते यामुळे रस्त्याची चाळणी झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत असे म्हणण्यापेक्षा या रस्त्यावर ‘डांबर दाखवा आणि बक्षीस मिळवा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या वाहनधारकांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते तसेच रुग्णांना या खड्डेमय रस्त्यावरुन दवाखान्यात जातांना इतका त्रास होतो की या रस्त्यावरुन दवाखान्यात जाण्यापेक्षा आजार बरा असे म्हणण्याची वेळ आली आहे.
म्हणून या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी शेंदुर्णी व सोयगाव येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी केली होती व आजही मागणी कायम आहे. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तसदी न घेता नूतनीकरणाच्या नावाखाली फक्त आणि फक्त रस्त्यावर थोडेफार डांबर व कच टाकून मेकअप केले जाते.
**************************************************
अजय टाकसाळ करत आहेत जनतेची हेंडसाळ.
**************************************************
या सर्व समस्यांना वैतागून शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी शेंदुर्णी व सोयगाव येथील नागरिकांनी दिनांक १३ जानेवारी २०२५ सोमवार रोजी निवेदन दिले असून या रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण करुन त्वरित नुतनीकरण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून येत्या आठवडाभरात या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात न झाल्यास दिनांक २२ जानेवारी २०२५ बुधवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता सोयगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच शेंदुर्णी येथील रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून या निवेदनावर शेंदुर्णी व सोयगाव येथील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
**************************************************
जामनेर व सोयगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात गुन्हे दाखल करणार.
*****************
शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने या रस्त्यावर अपघात होऊन आजपर्यंत दोन ते तीन वाहनधारकांनी आपला जीव गमावला असून बऱ्याचशा वाहनधारकांना अपंगत्व आले असून काहींना लाखो रुपये वैद्यकीय खर्च करावा लागला आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी वारंवार मागणी करुनही नूतनीकरण केले जात नसल्याने शेंदुर्णी व सोयगाव येथील सुज्ञ नागरिकांनी दिनांक १६ २०१९ व मा. संभाजीनगर खंडपीठाने दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या आदेशाचे वाचन करुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन दहा दिवसांचे आत शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्याचे नूतनीकरण न केल्यास या रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आजपर्यंत दोन ते तीन वाहनधारकांनी आपला जीव गमावला असल्याने जामनेर व सोयगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.