माजी पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते चेतन जैन यांचा सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२५
एखादा अधिकारी त्याची बदली झाल्यावर किंवा सेवानिवृत्त झाल्यावर सहसा कार्यरत असलेल्या गावाला किंवा तेथील संपर्कात आलेल्या लोकांशी सहजासहजी संबध ठेवत नाही थोडक्यात सांगायचे झाले तर ‘कामा पूरता मामा’ अशा पध्दतीने आपला कार्यकाळ पूर्ण करुन निघून जातात किंवा ‘गरज सरो वैद्य मरो’ असे समजून वागत व जगत असतात.
परंतू सगळेच अधिकारी किंवा कर्मचारी सारखे नसतात बरेचसे अधिकारी व कर्मचारी बदलून गेले किंवा सेवानिवृत्त झाले तरी ते त्यांनी जेथे, जेथे आपल कर्तव्य बजावले आहे तेथील मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवतात व त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस करुन सन, उत्सवाला किंवा वाढदिवसाला शुभेच्छा देऊन आपले नाते, संबध व्दिगुणित करत असतात.
असेच एक पोलीस विभागातील आजचे माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशी त्यांनी मागील १८ वर्षांपूर्वी चोपडा शहरात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले होते. चोपडा पोलीस स्टेशनला कामकाज करत असतांनाच कायदा, सुव्यवस्था, जातीय सलोखा राखण्यासाठी तसेच काही झालेले वादविवाद कायद्याच्या चौकटीत राहून आपसात मिटवण्यात त्यांचा हातखंडा होता. तसेच “सज्जनांचे मित्र तर दुर्जनांचे कर्दनकाळ” म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती.
चोपडा येथे १८ वर्षांपूर्वी पोलीस विभागात नोकरी केली नंतर त्यांची बदली व बढती झाली तरीही त्यांनी चोपडा वासियांसोबत आपले मैत्रीचे संबंध कायम ठेवले होते व आजही आहेत. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे चोपडा येथील पत्रकार ललीत जैन यांचे पुतणे चेतन सुनील जैन यांनी पोलीस विभागातील एल. सी. बी. चे शिक्षण पूर्ण केले ही माहिती सेवानिवृत्त माजी पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांना मिळताच त्यांनी थेट चोपडा येथील पत्रकार लतीश जैन यांचे घर गाठले व एल. सी. बी. उत्तीर्ण झालेले त्याचे पुतणे चेतन जैन यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व भविष्यात पोलीस विभागात काम करतांना काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करत रहा मी योग्य ते मार्गदर्शन करत राहिल असे सांगितले.
या सत्कार समारंभ प्रसंगी चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पत्रकार लतीश जैन, सुनील जैन, आकाश जैन, सौ. पिस्ता जैन, सौ. त्रिशला जैन, कु. नेतल जैन व इतर स्नेही मंडळी उपस्थित होती.
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांनी १८ वर्षांनंतर थेट चोपडा येथील पत्रकार लतीश जैन यांच्या घरी येऊन चेतन जैन यांचा सत्कार करत मनसोक्त गप्पा मारत व जैन परिवार तसेच चोपडा वासियांशी असलेले अतुट संबंध दाखवून दिले हे पाहून जैन परिवार व उपस्थित मंडळी भारावून गेले होते.