लकी ड्रॉ कुपनवर नाव बदलून, त्याच तिकीटावर तोच खेळ, लकी ड्रॉ कुपन घेणाऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२५
पाचोरा तालुक्यात श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या नावाखाली भाग्यवान ग्राहकांना विविध महागड्या वस्तू विक्रीसाठी एक योजना अमलात आणली होती. या योजनेच्या माध्यमातून १५००/०० रुपये किंमतीचे कुपन देऊन ग्राहक बनवण्याची शक्कल लढवून या श्री. एंटरप्राईजेस कडून एकूण ५५५५ ग्राहकांना कुपन विक्री करण्यात आले आहेत. या कुपन विक्रीतून १५००/०० रुपये प्रति कुपन प्रमाणे ५५५५ कुपन विक्री करुन ८,३३२,५०० इतकी रक्कम जमा करुन कुपन धारकांना कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याची घटना मागील वर्षी २९ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी पाचोरा शहरात उघडकीस आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर फसगत झालेल्या काही कुपन धारकांनी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र संबंधितांवर काय कारवाई करण्यात आली आहे याबाबत अद्यापही कोणतीही सविस्तर माहिती हाती आलेली नाही.
याचाच फायदा घेत पाचोरा तालुक्यात ज्यांनी श्री. मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाने लकी ड्रॉ कुपनवर भाग्यवान ग्राहकांना लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखवून लकी ड्रॉ न काढताच लाखो रुपये घेऊन पोबारा केला होता त्याच भामट्यांनी आता स्वताचे नाव बदलून व नवीन क्रमांकाचे मोबाईल सिम कार्ड घेऊन जालना शहरासह जिल्ह्यातील परभणी परिसरातील शहरात व गावागावात लकी ड्रॉ कुपन विक्री करुन आता परभणी येथील जुन्या टाकळी रस्त्यावरील गजानन मंगल कार्यालयात दिनांक १५ जानेवारी २०२५ बुधवार रोजी लकी ड्रॉ काढण्याचे जाहीर केले आहे.
त्यांनी पाचोरा शहर सोडल्यानंतर जालना, परभणी परिसरात आपले बस्तान मांडले असून पाचोरा तालुक्यात श्री. महालक्ष्मी इंटरप्रासेसच्या नावाने काढलेल्या लकी ड्रॉ कुपनवर असलेल्या नावात बदल करुन आता नव्याने श्री. मातोश्री इंटरप्रासेसच्या नावाने कुपन छापतांना स्वताच्या नावांची ओळख लपवून त्याजागी दुसऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची नावे छापली असून त्यांच्या नावाने लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतू या लकी ड्रॉचे खरे सुत्रधार ज्ञानेश्वर खालडे, शिवराय देशमुख, विशाल जाधव, मंगेश लव्हाटे, अरुण खलाडे, दत्तात्रेय शिंदे, अक्षय शिंदे, विठ्ठल तांगडे अशी नावे असून यांनीच पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा लोकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे व ते जालना व परभणी परिसरातून पलायन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.