१९ जानेवारी रविवार रोजी पाचोरा येथे विधी सेवा महा शिबीराचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२५
विधी सेवा समिती, दिवाणी फौजदारी न्यायालय व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ न्यायालयीन यंत्रणेच्या आदेशानुसार १९ जानेवारी २०२५ रविवार रोजी शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर शासकीय सेवा योजना महामेळावा व विधी सेवा महा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर तसेच वकील संघाचे अध्यक्ष मा. ॲड. प्रविण पाटील यांनी काल दिनांक १३ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सकाळी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मा. न्यायमूर्ती बोरा यांच्यासह वकील बांधव उपस्थित होते.
शासकीय सेवा योजना महामेळावा व विधी सेवा महा शिबिर पाचोरा येथुन जवळच असलेल्या अंतुर्ली शिवारातील निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक १९ जानेवारी २०२५ रविवार रोजी सकाळी ११ वाजेपासून तर दुपारी ०२ वाजे दरम्यान घेण्यात येणार असून या शिबिरासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश यांची उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिरात मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधिक्षक, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार, राज्य परिवहन अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून शासनाच्या महसूल, विज वितरण, कृषी, पालिका, परिवहन, आरोग्य यासह सर्वच शासकीय विभागाच्या सर्वसामान्य जनतेतील लाभार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या समजून घेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्वपूर्ण माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असून समाजातील सर्व घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये हा उदात्त हेतूने हे या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम राबविण्यात येत असल्याने सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.