कुऱ्हाड खुर्द येथील अतिक्रमण धारकाने हातवारे करत अधिकाऱ्यांसमोर तोडले अकलेचे तारे, अतिक्रमण काढण्यासाठी पहले तुम, पहले तुमची भुमिका घेत आहेत सारे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२४
कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसर हा महत्त्वाचा रहदारीचा परिसर असून याच परिसरातून पाचोरा, लोहारा ते जळगाव रस्ता, कुऱ्हाड ते वरखेडी रस्ता, कुऱ्हाड ते अंबे वडगाव रस्ता, कुऱ्हाड ते कळमसरा रस्ता जात असल्याने या बसस्थानक परिसरातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व याच बसस्थानक परिसरात टपऱ्या व पत्र्याचे शेड उभारुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून या अतिक्रमित दुकानातून सट्टा बेटिंग, गावठी, देशी व विदेशी दारुची अवैध विक्री रात्रंदिवस खुलेआम सुरु असल्यामुळे याठिकाणी व्यसनाधीन लोकांची जणू यात्राच भरते तसेच याच परिसरात जीवंत बकऱ्या, कोंबड्यांची भर रस्त्यावर हत्या करुन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे मांस उघड्यावर लटकत ठेवून विक्री केली जात असल्याने या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या महिला व लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. तसेच मासाचा उर्वरित टाकाऊ भाग येथेच फेकून दिला जात असल्याने याठिकाणी कुत्र्याची जणू यात्राच भरते यामुळे रहदारीला अडथळा व जाणाऱ्या, येणाऱ्यांना कुत्रा चावण्याची शक्यता नाकारता येत अशा आशयाच्या तक्रारी मागिल एक वर्षापासून करण्यात येत आहेत.
कारण बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत व याच ठिकाणाहून कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामस्थ, महिलावर्ग, शालेय विद्यार्थ्यी व विद्यार्थीनींना या बसस्थानक परिसरात बस येईपर्यंत थांबावे लागते व यावेळी त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो तसेच सायंकाळी शाळेतून घरी येतांना दारुड्यांच्या घोळक्यातून, अडचणीतून व वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेऊन मार्ग काढून यावे लागते यामुळे संपूर्ण अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत कुऱ्हाड खुर्द येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले होते.
याचीच दखल घेऊन कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार प्रयत्न केला व अतिक्रमण धारकांना वारंवार तोंडी व लेखी स्वरुपात सुचना देऊनही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले नाही म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून थेट न्यायालयात जाऊन अतिक्रमण काढण्यासाठी रितसर मान्यता मिळवून घेतल्यावर सुध्दा अतिक्रमण धारक जुमानत नसल्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी पावले उचलली आहेत.
म्हणून अतिक्रमण काढण्यासाठी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत मार्फत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर अर्ज देऊन पोलीस मदतीची मागणी केली आहे. याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेबांनी दिनांक १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी कुऱ्हाड खुर्द गावात येऊन झालेल्या अतिक्रमणाची पाहाणी केली व अतिक्रमण धारकांनी स्वताहून अतिक्रमण काढून घ्यावे अशी समज दिली.
परंतू याच वेळी अतिक्रमण करुन त्या जागेवर अवैध धंदा करणाऱ्या एका व्यवसायीकाने कशाचाही धाक न बाळगता एका सक्षम अधिकाऱ्यासमोर हातवारे करत अकलेचे तारे तोडले हे दृश्य पाहून यावेळी कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरात उपस्थित असलेल्या सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला कारण ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण करुन त्या जागेवर अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायीकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने हे अतिक्रमण त्वरित काढण्यासाठी पावले उचलली पाहिजे असे मत व्यक्त केले.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी आज सकाळी अतिक्रमण धारकांना समाज दिल्यानंतर अतिक्रमण धारकांनी सहमती दर्शवली आहे. मात्र अतिक्रमण काढण्यासाठी स्वताहून कुणीही पुढे येत नसल्याने हि अतिक्रमण काढण्याची मोहीम “पहले तुम, पहले तुम” अशा पेचात अडकली असल्याचे बोलले जात आहे.