गगनचुंबी इमारतीवर बांधली जाताहेत घरकुल, लाभधारक, सरपंच व ग्रामसेवकांची मिलीभगत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक, लाभधारक व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा केला जात असून घरकुल योजनेअंतर्गत मर्जीतल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देतांना शासनाने ठरवून व घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे तसेच मर्जीतल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देतांना घरकुल न बांधताच घरकुल योजनेचा निधी देणे, लाभार्थ्यांजवळ स्वताचे पक्के घर उपलब्ध असतांनाही त्याला घरकुल योजनेचा लाभ देणे, तसेच बऱ्याचशा ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी स्वागतासाठी घरकुल योजनेचा लाभ घेतला असून असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायतीमध्ये झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत लवकरच सखोल माहिती घेऊन या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले सरपंच, ग्रामसेवक, घरकुल लाभार्थी व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी संगनमताने घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून घरकुल बांधलेले नसतांनाही खोटी कागदपत्रे तयार करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत घरकुल योजनेचा निधी परस्पर काढून दिला असल्याने आजच्या परिस्थितीत पाचोरा तालुक्यातील शेकडो घरकुले चोरीला गेली आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
अजून एक विशेष बाब म्हणजे या योजनेतील लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळेल अशा पात्र अर्ज धारकांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुने कच्चे घर पक्के करण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ मिळाल्यानंतर शासनाने दिलेल्या जमिनीवर किंवा स्वाताचे कच्चे घर पाडून त्या जागेवर घरकुल योजनेतून २७० चौरस फूट इतक्या क्षेत्रफळात बांधकाम करणे अत्यावश्यक आहे. परंतू हे सगळे नियम व अटी धाब्यावर बसवून लाभार्थ्याजवळ स्वताचे पक्के घर उपलब्ध असतांनाही घरकुल योजनेचा लाभ दिला गेला असून काही बोगस लाभार्थ्यांनी आपल्या गगनचुंबी इमारतीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर घरकुल बांधून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे.
म्हणून पाचोरा तालुक्यात आजपर्यंत देण्यात आलेल्या घरकुल योजनेची सखोल चौकशी करुन घरकूल न बांधताच खोटे दस्तऐवज तयार करुन घरकुल योजनेच्या निधीचा अपहार करणारे तसेच घरकुल योजनेचा लाभ घेणारे धनदांडगे बोगस लाभार्थी शोधून गगनचुंबी इमारतीवर घरकुल कसे काय बांधले गेले आहेत किंवा बांधले जात आहेत याची सखोल चौकशी करुन या घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार करणारे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, संबंधित जबाबदार अधिकारी व लाभधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी घरकुल योजनेपासून वंचित असलेले लाभधारक व सुज्ञ नागरिकांनी केली असून या घरकुल योजनेचा घोटाळा उघडकीस न आणल्यास लवकर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.