यहां पर सब शांति, शांति है। वरखेडी गावात प्रथमच अवैध धंदे बंद, महिला वर्गाने मानले पोलीसांचे आभार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे चक्री नावाच्या ऑनलाईन जुगाराच्या व्यवसायिकांनी थैमान घातले होते. या ऑनलाईन चक्री नावाच्या जुगारमुळे अल्पवयीन मुले तरुण तुर्क व म्हातारे अर्क व्यसनाच्या आहारी जाऊन दररोज हजारो रुपये गमावत होते. यामुळे घराघरात भांडणतंटे होऊन अशांतता निर्माण झाली होती. याची दखल घेऊन वरखेडी व भोकरी गावातील सुज्ञ नागरिक व महिला वर्गाने सत्यजित न्यूजकडे आपले गाऱ्हाणे मांडले व हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली होती.
याची दखल घेऊन दिनांक ०५ जानेवारी रविवार रोजी “वरखेडी गावात चक्रीचा तडाखा, अनेकांचे संसार उद्धवस्त या मथळ्याखाली सत्यजित न्यूज कडून या ऑनलाईन चक्रीच्या अवैध धंद्याबाबत वृत्त प्रकाशित होताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी पाठवले होते. मात्र पोलीस आल्याचा सुगावा लागताच चक्री नावाचा ऑनलाईन जुगार चालवणारांनी अगोदरच पळ काढला होता.
सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी धाडसत्र सुरु केल्याचा राग येऊन एका चक्री चालवणाऱ्या व्यवसायिकाने वरखडी बाजारपेठेत पत्रकारांना शिव्यांची लाखोली वाहत मनसोक्त तोंडसुख घेतले होते अशी माहिती समोर आली असून संबंधित अवैध धंदे करणारांची कमाई बंद झाल्याने त्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने भविष्यात पत्रकारांना या व्यावसायिकांकडून उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असे असले तरी सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे यांनी स्वता व त्यांच्या सहकारी वरखेडी गावातील अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायीकांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्यामुळे आज दिनांक ०९ जानेवारी २०२५ गुरुवर रोजी वरखेडी येथील आठवडी बाजार असल्यावरही अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायीकांनी काढता पाय घेतल्यामुळे सगळीकडे शांतता दिसून येत आहे.
यामुळे वरखेडी येथील आठवडी बाजारात येणाऱ्या खेड्यापाड्यातील महिला, पुरुष व वरखेडी येथील महिला पुरुषांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे आभार मानले असून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद ठेवण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कारण वरखेडी गावात अवैध धंदे सुरु होते तेव्हा बरेचसे खेड्यापाड्यातील लोक बाजर करण्यासाठी वरखेडी येथील आठवडी बाजार येत होते, मात्र बरेचसे व्यसनाधीन लोक बाजार करण्याऐवजी नशीब आजमावण्यासाठी या अवैध धंद्याच्या ठिकाणी जाऊन जुगारात पैसे हारल्यावर रिकाम्या थैल्या घरी घेऊन जात असल्याने घराघरात भांडणतंटे होऊन यातुनच महिलांना मारठोक करणे घरातील संसारोपयोगी वस्तू व दागदागिने विकणे असे प्रकार घडत होते.
आजच्या परिस्थितीत सगळे अवैध धंदे बंद झाल्याने महिला वर्गाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे व सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले आहेत.