पाचोरा शहरासह तालुक्यात बनावट ताडी, देशी व गावठी दारुची खुलेआम विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोमात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०१/२०२५
कुठेही अवैधरित्या गांजा, ताडी, देशी दारुची किंवा गावठी दारुची निर्मिती व विक्री सुरु असल्यास याला पोलीस प्रशासनाला जबाबदार धरुन बोंबाबोंब केली जाते. मात्र अधिकृत मद्यार्क युक्त व अंमली पदार्थ विक्रीतून मिळणारे उत्पादन शुल्क जमा करणे तसेच अनधिकृत उत्पादन, तस्करी, विक्री व शुल्क पात्र वस्तूंचा वापर शोधणे, शुल्क पात्र वस्तूंचे उत्पादन करणारी ठिकाणाचे सर्वेक्षण करणे, अवैध मार्गाने राज्य सरकारचा कर चुकवून नकली, बनावट विक्री केल्या जाणाऱ्या मद्यार्क युक्त व अंमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे.
मात्र आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहर व तालुक्यातील खेड्यापाड्यात घातक पद्धतीने बनवलेली रासायनिक बनावटीची ताडी, बनावट देशी दारु व घातक पदार्थ वापरुन बनवलेल्या गावठी दारुची निर्मिती व विक्री राजरोसपणे, बिनदिक्कत सरु आहे. यामुळे सगळीकडे ताडी, देशी व गावठी दारु मुबलक प्रमाणात मिळत असल्याने अल्पवयीन मुले, तरुण तुर्क व म्हातारे अर्क व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य बरबाद होत असल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून अनेक कुटुंबे बरबादीच्या मार्गावर आहेत.
याबाबत जनमानसातून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवला तसेच बऱ्याचशा समाजसेवी संघटना व महिलांनी निवेदन देऊन आंदोलने केली मात्र सर्व प्रकारच्या मादक पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली गेली नाही तर उलट गांजा, ताडी, बनावट देशी दारु व गावठी दारुची निर्मिती व विक्री राजरोसपणे, बिनदिक्कत सरु आहे.
असे असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला असून या सुज्ञ नागरिकांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहर व तालुक्यातील खेड्यापाड्यात पान टपरी, उपहारगृह, थंड पेय विक्रीची दुकाने व काही ठिकाणी गल्लीबोळात गांजा, ताडी, देशी व गावठी दारुची विक्री केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे कारण सांगितले जाते मात्र ही पळवाट असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन ते कारवाई करु शकतात असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. परंतू उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे जाणूनबुजून कारणे दाखवून अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पाचोरा शहरासह तालुक्यात बनावट ताडी, देशी व गावठी दारुची खुलेआम विक्री जोमात, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोमात असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.