सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा यात्रेला सुरुवात, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे सालाबादप्रमाणे पौष महिन्यात प्रत्येक रविवारी भरणाऱ्या श्री. भैरवनाथ बाबांच्या यात्रोत्सवाला दिनांक ०५ रविवार पासुन सुरवात झाली असून यात्रेत पहिल्याच रविवारी हजारो भाविकांनी हजेरी लावली. तसेच यात्रेत संसारोपयोगी वस्तू, रहाट पाळणे, हॉटेल्स, उपहारगृह, लहान मुलांच्या मनोरंजनाचे विविध खेळ, खेळणी याची दुकाने सजली होती. भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन रोडग्यांचा तसेच नारळाचे तोरण बांधून व गुळ वाटून नवस फेडून श्री. भैरवनाथ बाबांचे दर्शन घेतले.
श्री. भैरवनाथ बाबा मंदिर ते सावखेडा, वरखेडी ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर वाहनांची व भावीकभक्तांची अलोट गर्दी दिसून येत होती. या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यात्रेत सामील होणाऱ्या यात्रेकरुंच्या दुचाकी, चारचाकी, बैलगाड्या यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रहाट पाळणे, मंदिर परिसरात व संपूर्ण यात्रेत ठिकठिकाणी पोलीस व स्वयंसेवक नेमून शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले.
*************************************************
यात्रेत येतांना किंमती वस्तू व दागदागिने आणू नये.
*************************************************
श्री. भैरवनाथ बाबा यात्रोत्सवाचा पहिल्या रविवारी यात्रा शांततेत पार पडली असून अजून दिनांक १२, १९, २६ रा रोजी यात्रोत्सव साजरा होणार असून या यात्रेत येतांना महिलांनी अंगावर किंमती दागदागिने व गरजेपेक्षा जास्त पैसे आणू नयेत तसेच यात्रेत आल्यानंतर आपल्या सोबत असलेल्या लहान मुलांची काळजी घ्यावी व कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे साहेबांनी केले आहे.