वरखेडी गावात चक्रीचा तडाखा, अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी येथे वरखेडी, भोकरी गावाच्या मधे असलेल्या शनि मंदिर परिसरात टपरीवजा दुकानात चक्री नावाचा ऑनलाईन जुगार खेळवला जात असून या जुगाराच्या आहारी जाऊन अल्पवयीन मुलें, तरुण तुर्क व म्हातारे अर्क दररोज हजारो रुपयांची राखरांगोळी करत आहेत.
ज्याप्रमाणे नैसर्गिक चक्रीवादळाचा तडाखा बसल्यावर स्थावर मालमत्तेसह व कधी, कधी जीवितहानी होते तसाच काहीसा तडाखा या चक्री नावाच्या ऑनलाईन खेळामध्ये अल्पवयीन मुले, तरुण तुर्क व म्हाताऱ्या अर्कांना बसत आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण ज्यांना, ज्यांना या चक्री म्हणजे एकप्रकारे ऑनलाईन सट्टा या खेळाचे व्यसन लागले आहे ते व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी दररोज कमावलेले पैसे, घरातील संसारोपयोगी वस्तू व धनधान्य विकून तसेच महिलांच्या अंगावरील दागदागिने विकून किंवा व्याजाने पैसे घेऊन याठिकाणी चक्री नावाचा जुगार (सट्टा) खेळत आहे.
यामुळे व्यसनाधीन लोकांच्या घरात दररोज भांडणतंटे होऊन यातुनच महिलांना मारठोक करणे, घरातील इतर सदस्यांना पैशांसाठी त्रास देणे, व्यसनपूर्तीसाठी चोऱ्या करणे अशा घटना घडत आहेत. म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी हा चक्री नावाचा ऑनलाईन जुगार त्वरित बंद करावा अशी मागणी असंख्य महिला व सुज्ञ नागरिकांनी केली असून हा चक्रीचा ऑनलाईन सट्टा बंद न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
*************************************************
“आमच्या पाठीशी आहे भाऊ सारखी हस्ती, म्हणून आम्हाला कुणाचीच नाही धास्ती” ऑनलाईन चक्री सट्टा व्यवसायीकांची अशीही हुकुमशाही.
*************************************************
आमच्या धंद्याबाबत कुणी आवाज काढला तर गाठ आमच्याशी आहे अशी मर्दुमकी गाजवत आमच्या पाठीशी आहे त्यात्या, भाऊंसारखी हस्ती म्हणून आम्हाला कुणाचीच नाही धास्ती असा डॉयलॉग मारुन खुलेआम, दिवसरात्र हा व्यवसाय राजरोसपणे बिनदिक्कत सरु आहे.