जारगाव येथील विनापरवाना उद्योगधंदे व कारखाने त्वरित हटवण्यासाठी सुदामा कॉलनी बचाव समितीचे धरणे आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२५
पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या जारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुदामा रेसिडेन्सी या रहिवासी वस्तीतील परिसरात ज्याठिकाणी फक्त आणि फक्त रहाण्यासाठी घरे बांधण्याची परवानगी असतांना याच सुदामा रेसिडेन्सी मध्ये काही भांडवलदारांनी प्लॉट खरेदी करुन त्याठिकाणी निवासी घरे न बांधता लोकवस्तीच्या नियमांची पायमल्ली करत जारगाव ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता त्या जागेवर अनाधिकृत रीतीने दुध डेअरी सह विविध व्यवसायाची दुकाने सुरु केले आहेत या अनाधिकृत व्यवसायामुळे सुदामा रेसिडेन्सी मध्ये रहात असलेल्या रहिवाशांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत असल्याने तेथील रहिवाशांनी आज सुदामा रेसिडेन्सी कॉलनी बचाव कृती समितीच्या माध्यमातून दिनांक ०१ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता सुदामा रेसिडेन्सी मध्ये रहात असलेल्या रहिवाशांनी सुदामा रेसिडेन्सी ही फक्त आणि फक्त रहाण्यासाठी म्हणजे नागरी वसाहत आहे. परंतु याच परिसरात जारगाव ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी न घेता या सुदामा रेसिडेन्सी मध्ये काही भांडवलदारांनी प्लॉट विकत घेऊन त्याठिकाणी दुध डेअरी, मार्बल, दगडी फरशी, धान्यांचे कोठार व अन्य व्यवसाय सुरु केले आहेत.
या व्यवसायाला अनुसरुन हे व्यावसायीक त्यांच्या व्यवसायासाठी बाहेरुन ठोक पध्दतीने माल खरेदी करुन आणतात. हा खरेदी केलेला माल, सामान त्यांच्या दुकानात किंवा कारखान्यात आणतांना मोठ, मोठ्या वाहनातून आणतात तसेच हाच आणलेला माल, सामान विक्री केल्यानंतर ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी मोठ, मोठ्या वाहनातून पाठवत असतात. परंतु हा व्यवसाय करतांना वाहने आणतांना व बाहेर नेतांना कधी रात्रीबेरात्री तर कधी दिवसा कोणताही काळवेळ ठरवता अतिवेगाने वाहने आणत असल्याने सुदामा रेसिडेन्सी मध्ये रहात असलेल्या रहिवाशांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत असून यात रात्रभर खडखडाट होत असल्याने लहान, लहान मुलाबाळांसह जेष्ठ, श्रेष्ठ नागरिक व रुग्णांना झोप घेणे दुरापास्त होऊन शारीरिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे.
तसेच याच परिसरात एक दुध डेअरी असून या दुध डेअरी मध्ये मोठ, मोठे टॅंकर येतात व जातात यामुळे सततच्या आवाजामुळे खूपच त्रास सहन करावा लागत असून या दुध डेअरी मध्ये दुधाची प्रत पाहण्यासाठी फॅट काढतांना ॲसिड व इतर रसायनांचा वापर केला जातो व काम झाल्यानंतर हेच रसायन सांडपाण्याच्या गटारी मधून भर वस्तीतून वाहत असल्याने सगळीकडे दुर्गंधीयुक्त पसरली आहे.
तसेच डेअरीचे दुर्गंधीयुक्त पाणी व सुदामा रेसिडेन्सी मध्ये रहात असलेल्या रहिवाशांचे दैनंदिन कामानिमित्त वापर झालेले घराबाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी ज्या सांडपाण्याच्या गटारी बनवण्यात आल्या आहेत या गटारी वर काही उद्योगपतींनी अतिक्रमण करुन गटारी बुजवून टाकल्या असल्याने हे सांडपाणी भरवस्तीत तसेच या वस्तीजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेत जमा होऊन त्याठिकाणी मोठा तलाव साचला असून या घाण पाण्याच्या तलाव सदृश पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. सोबतच या दलदलीच्या ठिकाणी साप, विंचू व इतर विषारी प्राण्यांची उत्पत्ती होत असून याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
याबाबत मागील काही वर्षांपासून सुदामा रेसिडेन्सी मध्ये रहात असलेल्या रहिवाशांनी शांतताप्रिय मार्गाने
जारगाव ग्रामपंचायत, मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार, मा. पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार निवेदने दिली आहेत मात्र तरीही आमच्या समस्या सोडविण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नसल्याने तसेच थातुरमातुर कारवाई केली जात असल्याने सुदामा रेसिडेन्सी मध्ये अवैध उद्योगधंदे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
म्हणून होणारे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, अवजड वाहनांमुळे खराब होणारे रस्ते, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा, सांडपाण्याच्या उघड्या गटारी, यामुळे निर्माण होणारे डास, दुर्गंधी, पथदिवे, अशा अनेक समस्या कायम असून या सोडविण्यासाठी जारगाव येथील रहिवाशांनी आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी मा. प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीने महिला, पुरुषांसह एक दिवसीय धरणे आंदोलन करुन निषेध नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून सुदाम रेसिडेन्सी मध्ये यापुढे वाढती कारखानदारी, वाढते प्रदुषण व विविध समस्यांमुळे कोणत्याही आजाराची लागण झाल्यास किंवा वाहनांमुळे अपघात होऊन जिवीतहानी झाल्यास आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणरे शासन, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार रहातील असा इशारा दिला आहे.
या सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीच्या एक दिवस निषेध धरणे आंदोलनात सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समिती सदस्य निलिमा परदेशी, शीतल विजय तावडे, विजय नथ्यु तावडे, रजा उमाळे, ज्ञानेश्वर उमाळे, रामधन परदेशी, संगीता परदेशी, संदिप चौधरी, अनिता चौधरी, दिपराज पाटील. युवराज पाटील, संदीप पाटील, छाया पाटील, गोपीचंद पाटील, शिला पवार, पमाबाई पाटील, नामदेव पाटील, सोनल संघवी, प्रशांत संघवी, मनीषा पाटील, मंगल महाले, योगिता पवार, वंदना बाविस्कर, ज्योत्स्ना पाटील, शरद पाटील, कोमल जाधव, सिद्धार्थ जाधव, वैशाली चौधरी, हर्षल चौधरी, अश्वती चौधरी, भगवान चौधरी, नूतन चौधरी, पूनम सलगर, बापू अहिरे, वैशाली अहिरे, पूनम कुमावत, निंबा कुमावत, बाळासाहेब कुमावत, सुवर्णा पवार, पूजा पाटील, सुनील पाटील, सचिन उमाळे, वर्षा ऊभाळे, कविता डोंगरे, किशोर डोंगरे, दिलीप पाटील, सुलोचना पाटील, हरी महाजन यांच्यासह शेकडो रहिवाशांनी जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला.
याची दखल घेऊन मा. गटविकास अधिकारी यांनी जारगाव ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन जारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंबिका डेअरी, बर्फाची फॅक्टरी, स्टाईल व घरबांधणी सामानाचे दुकान, नॅशनल मार्बल, जलाराम ट्रेडर्स, अंबिका सरकी, ढेप गोदाम व विक्री केंद्र, अंबिका ट्रेडर्स या सुरु असलेल्या उद्योग व्यवसायाची सखोल चौकशी करुन अहवाल सादर करावा तसेच संबंधित उद्योग व्यवसायीकांनी जारगाव ग्रामपंचायतीकडून रितसर नाहरकत न घेता अनाधिकृत पध्दतीने उद्योगधंदे सुरु केले असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करुन तसा अहवाल सादर करावा तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ नुसार अतिक्रमण काढुन जारगाव येथील रहिवाशांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कठोर पावले उचलावीत असे लेखी स्वरुपात सुचित केले आहे.
****************************************************
जारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत डॉ. प्रशांत पाटील याचे सुधन हॉस्पिटल असून जारगाव येथील सुदामा रेसिडेन्सी येथील रहिवाशांनी त्यांच्या तक्रारी अर्जात या सुधन हॉस्पिटल बद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. परंतु याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता वैद्यकीय व्यवसाय हा सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी व जीवनाशी निगडित असल्याने कोणत्याही मानव वस्तीत वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी मुभा असते परंतु संबंधित दवाखान्याच्या संचालकांनी दवाखान्यात वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या सुया (निडल्स), सिंगल यूज वापरातील उपकरण, वस्तू व रुग्णांवर उपचार केल्यानंतर निकामी झालेले साहित्य उघड्यावर न फेकता त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे, दवाखान्याच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे व इतर खबरदारी घेणे गरजेचे असते अशी माहिती समोर येत आहे.
****************************************************