वाळू चोरी थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे, तहसील मा. विजय बनसोडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२४
वाळू चोरी थांबवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी व मा. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार आज दिनांक ०१ जानेवारी २०२५ बुधवार रोजी दुपारी तीन वाजता पाचोरा तहसीलदार मा. श्री. विजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली, कुरंगीच्या सरपंच श्रीमती मंगलाबाई पाटील, उपसरपंच श्री. दिनकर सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक श्री. आबासाहेब पाटील, मंडल अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख व कुरंगी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामस्थरीय दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
या ग्रामस्थरीय दक्षता समितीच्या बैठकीत नदीतून वाळू उपसा जास्त प्रमाणात झाला तर पाण्याची पातळी खालावते व आसपासच्या विहीरी व भुगर्भातील जल पातळी झपाट्याने कमी होऊन याचा फटका गावकऱ्यांना बसतो व निसर्गाचा समतोल ढासळतो म्हणून वाळू उपसा थांबवण्याची जबाबदारी ही महसूल, पोलीस, परिवहन व ग्रामविकास विभागाची सामुहिक जबाबदारी आहे. म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा ग्राम महसूल अधिकारी श्री. नदीम शेख यांनी कुरंगी ग्रामस्थांना संबोधित करतांना व्यक्त केली.
तसेच वाळू चोरी मुळे जल पातळी झपाट्याने कमी होते तसेच निसर्गाचा समतोल बिघडतो व याच बरोबर गुन्हेगारी वाढून शांतता भंग पावते, अपघात होतात, आयता पैसा मिळत असल्याने व्यसनाधीनता वाढते, याचे दुष्परिणाम समाजातील घटकांमध्ये होऊन असुरक्षिततेची भावना निर्माण होते. यातुनच जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होतात व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते हे पटवून देत वाळू तस्करी थांबण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी असे आवाहन केले.
तदनंतर पाचोरा तहसील विजय बनसोडे यांनी कुरंगी ग्रामस्थांना सविस्तर माहिती देत पाचोरा कार्यालयाकडून आजपर्यंत १२३ व्यक्तींना चॅप्टर केसेसच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत म्हणून कुणीही घाबरुन न जाता वाळू चोरी थांबवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे व वाळू चोरी होतांना आढळून आल्यास आम्हाला त्वरित फोन करावा असे आवाहन करत कुरंगी ग्रामस्थांना संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिला. तसेच गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लोकांकडून कुठलाही त्रास किंवा धमकी दिली जात असेल तर आम्हाला कळवा आम्ही तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही तहसीलदार मा. विजय बनसोडे यांनी कुरंगी ग्रामस्थांना दिली.
या बैठकीत मा. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरंगी ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील व संपूर्ण कुरंगी ग्रामस्थांनी कुरंगी गाव परिसरातून गौण खनिज व वाळू वाहतूक होऊ देणार नाही अशी सामुहिक प्रतिज्ञा केली. या बैठकीत कुरंगी ग्रामस्थांनी केलेली सामुहिक प्रतिज्ञा व सहकार्याची उमेद पाहून मा. तहसीलदार विजय बनसोडे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुरंगी ग्रामस्थांना धन्यवाद दिले.