कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, पोलीस निरीक्षक मा. मुरलीधर कासार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२४
आज ३१ डिसेंबर २०२४ यानिमित्ताने नवीन वर्षाच्या स्वागताला सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. परंतु हे नवीन वर्ष साजरं करतांना जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी जामनेर शहरासह तालुका वासियांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. तो असा की तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करा परंतु हे करत असतांना कुठेही अतिरेक होऊन शांतता भंग होणार नाही याचे भान ठेवून साजरे करा थोडक्यात सांगायचे झाले तर पोलीस निरीक्षक कासार यांच्या सुचनेनुसार कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा इशारा दिला आहे.
पोलीस निरीक्षक कासार यांनी यावेळी जामनेर शहर व तालुक्यातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत कायद्या सुव्यवस्थेचे पालन करुन शांतता राखा व पोलीसांना मदत करा असे आवाहन केले. सोबतच नववर्षाचे स्वागत करतांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करु नका, मद्यपान करुन वाहने पळवू नका नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल कारण पोलीस दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत व तसे आढळल्यास कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल म्हणून वाहन चालकांनी अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसेच भरचौकात किंवा गल्लीबोळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे टाळा, जास्त आवाजाने ध्वनिक्षेपक वाजवून आरडाओरडा करुन गोंधळ घालु नका, नववर्षाचे स्वागत करण्यासाठीच्या समारंभात सामील होण्यासाठी कुणावरही जबरदस्ती करु नका, भररस्त्यावर धिंगाणा किंवा गोंधळ घालून शांतता भंग करतांना कोणीही आढळून आल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही व तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणून कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करुन कायद्याचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे असे आवाहन केले आहे.
विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताच्या प्रसंगी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामनेर पोलीसांची पथके तयार करण्यात आले असून जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात गस्त वाढवून सगळीकडे बारीक लक्ष ठेवून जो कुणी कायदा हातात घेईल त्याच्यावर त्याक्षणी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कासार यांनी सांगितले व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.