सर्व्हर डाऊन असल्याने पाचोरा पुरवठा विभागाची कामे खोळंबली, रेशनकार्ड धारकांची तारांबळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२४
पाचोरा पुरवठा विभागातील सर्व्हर दिनांक २४ डिसेंबर २०२४ मंगळवारपासून डाऊन असल्याने पुरवठा विभागातील कामे खोळंबली असून रेशनकार्ड धारकांची तारांबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा पुरवठा विभागातील सर्व्हर डाऊन असल्याने पुरवठा विभागातील कामे खोळंबली असून पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशनकार्ड धारकांची तारांबळ उडाली आहे. कारण पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोक रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड मध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे, स्वतंत्र रेशनकार्ड बनवणे बारा अंकी कोड घेऊन रेशनकार्ड ऑनलाईन करणे व इतर कामांसाठी रोजंदारी बुडवून तसेच भाडे खर्च करुन दररोज पुरवठा विभागात येतात परंतु सर्व्हर डाऊन असल्याने त्यांची कामे होत नसल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागते.
तसेच सर्व्हर सुरु असले तरीही ते व्यवस्थित चालत नसल्याने पुरवठा विभागातील कर्मचारी इच्छा असूनही काम करु शकत नाही. याचाच फायदा घेत पुरवठा विभागाच्या कार्यालयात व कार्यालयाबाहेर काही एजंट (दलाल) फिरत असतात व ते अशा गरजू ग्राहकांना शोधून काढतात व तुमचे काम आम्ही करुन देतो असे सांगून गरजू रेशनकार्ड ग्राहकांकडून ५००/०० रुपया पासून तर गरज पाहून ३०००/०० रुपये घेतात असे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे रेशनकार्ड धारकांनी स्वता रेशनकार्ड घेऊन अर्जफाटे केल्यावरही जे काम सहा, सहा महिने होत नाही तेच काम हे एजंट (दलाल) यांच्यामार्फत काही दिवसातच होते ही बाब लक्षात घेण्यासारखी असून या पुरवठा विभागाच्या अनागोंदीला कोण लगाम घालेल व गोरगरीबांची होणारी लुट थांबेल थांबवण्यासाठी चौकशी करुन कारवाई केली जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.