ग्रामसेवक दाखवा आणि बक्षिस मिळावा, मालखेडा ग्रामस्थांचा जाहीर फतवा.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/12/Picsart_24-12-30_09-27-30-364-660x400.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथुन जवळच असलेल्या मालखेडा गावात मालखेडा ग्रामपंचायतीवर नियुक्त असलेले ग्रामसेवक मागील तीन ते चार महिन्यांपासून हरवले आहेत अशी माहिती मालखेडा ग्रामस्थांनी दिली असून मालखेडा गावात तीन ते चार महिन्यांपासून ग्रामसेवक उपलब्ध होत नसल्याने मालखेडा ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून पाहिजे असलेली कागदपत्रे मिळवत नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली आहेत.
तसेच मुबलक पाणी उपलब्ध असतांनाही नळांना पंधरा, पंधरा दिवस पाणी येत नसल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन गावाशेजारील किंवा शेत शिवारात जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. विहिरीचे पाणी पिण्यात येत असल्याने लहान, लहान मुलाबाळांसह सगळ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते आहे. तसेच गावातील सांडपाण्याच्या गटारी तुडुंब भरल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून गावात दुर्गंधी पसरली असून डासांचा उपद्रव वाढला असल्याचे मालखेडा ग्रामस्थांनी सांगितले.
या समस्या मांडण्यासाठी सरपंच यांच्याकडे गेल्यावर मालखेडा गावच्या सरपंच ह्या महिला असून त्यांच्या जागेवर त्यांचे पतीराज कामकाज पहात आहेत. त्यांच्याकडे समस्या सांगितल्यावर ते काहीही ऐकून घेत नाही व बघुन घेऊ, करुन घेऊ, होऊन जाईल, ग्रामसेवक आल्यानंतर बघू, ग्रामसेवकाला सांगा अशी उत्तरे देतात मात्र कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात नाही.
तसेच विशेष बाब म्हणजे मालखेडा गावासाठी नियुक्त करण्यात आलेले ग्रामसेवक मालखेडा गावात हजेरी लावत नसल्याने व सरपंच पती कोणाचेही ऐकुन घेत नसल्याने मालखेडा ग्रामस्थांनी सरतेशेवटी वैतागून ग्रामसेवक दाखवा व बक्षिस माळवा असा फतवा काढला असून येत्या आठ दिवसांत मालखेडा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवक हजर न झाल्यास जामनेर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा मालखेडा ग्रामस्थांनी दिला आहे.
*****************************************************
गाव एक ग्रामसेवक दोन, मालखेडा गावचा कारभार बघणार कोण.
*****************************************************
मालखेडा ग्रामपंचायतीवर मागील तीन ते चार महिन्यांपासून ग्रामसेवक हजर रहात नसल्याचे मालखेडा ग्रामस्थांनी सांगितल्यावर सत्यजित न्यूजच्या माध्यमातून खरा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता सरपंच पती योग्य माहिती देऊ शकले नाहीत. म्हणून मालखेडा ग्रामपंचायतीवर नियुक्त असलेल्या ग्रामसेवकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन विचारले असता माझी बदली झाली असून माझ्या जागेवर दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले.
म्हणून नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या ग्रामसेवकांना भ्रमणध्वनीवर विचारले असता माझी मालखेडा ग्रामपंचायतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मी सद्यस्थितीत वैद्यकीय रजेवर असल्याने मी अद्यापपर्यंत मालखेडा ग्रामपंचायतीवर हजर झालो नसल्याने तेथील कामकाज आधिचे ग्रामसेवक हेच बघत आहेत असे सांगितले.
या ग्रामसेवकांची तू, तू मैं, मैं भुमिका व मालखेडा ग्रामपंचायतीवर महिला सरपंच असल्याने त्यांच्या जागेवर त्याचे पतीराज कामकाज पहात असल्याने मालखेडा ग्रामस्थांची परिस्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे.