आम्हाल एक तर मरणाची किंवा मारण्याची परवानगी द्यावी, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२४
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारी प्रसारमाध्यमे व त्यांचे प्रतिनिधी हे देश व समाजहितासाठी जीवाचे रान करुन दिवसरात्र जीव धोक्यात घालून वृत्त संकलन व वृत्त प्रकाशित करत असतात. हे काम करत असतांना ग्रामीण भागातील पत्रकार आहे त्या परिस्थितीत जनजागृती, जनप्रबोधन करत असतो या सोबतच सार्वजनिक हितासाठी व देशाच्या सुरक्षिततेसाठी लेखन करत कसतो परंतु तरीही आजच्या काळात पत्रकार सुरक्षित नाहीत ही खेदाची बाब आहे.
याचेच जिवंत उदाहरण पदोपदी बघायला मिळते याचे मुळ कारण म्हणजे महाराष्ट्रात सर्वदूर अवैध धंदे व वाळू तसेच गौण खनिज माफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांना लगाम घालण्यासाठी तसेच देश व समाजहितासाठी पत्रकार आपल्या लेखणीतून कधी ड्रग माफिया तर कधी राज्याचा महसूल वाचावा व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व्हावे म्हणून वाळू व गौण खनिज माफियांच्या विरोधात वृत्तांकन करत असतात.
परंतु याच वृत्तांकन व प्रसिद्धी केलेल्या बातम्यांचा राग मनात धरुन किंवा सतत बातम्या प्रसारित झाल्या तर आपलं पितळ उघडे पडून व्यवसाय बंद होईल या भीतीने या माफियांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील बऱ्याचशा पत्रकारांना दमदाटी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, पत्रकारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणे हल्ले करणे अशा घटना सातत्याने घडत असून अशा गुंड माफियांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली असून ते आता खुन करायला घाबरत नाहीत.
अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथे घडली असून दिव्य मराठी या दैनिकाचे प्रतिनिधी अमृतकर यांच्या घरावर वाळू माफियांच्या १५ ते २० लोकांच्या टोळक्याने अचानकपणे जीवघेणा हल्ला चढवून पत्रकार अमृतकर यांच्या पत्नीला व घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली म्हणण्यापेक्षा जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आजपर्यंत बऱ्याचशा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीवर जीवघेणे हल्ले तर काहींचा खुन केला आहे. परंतु पत्रकार स्वसंरक्षणासाठी कायदा असूनही ठोस कारवाई केली जात नसल्याने पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ल्यांचे प्रमाणात वाढ होत आहे.
म्हणून कजगाव येथील पत्रकार अमृतकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून शासन व प्रशासन जर कारवाई करण्यात अकार्यक्षम ठरत असेल तर आम्ही सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी संघटीत होऊन महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशन, प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मरणाची किंवा मारण्याची परवानगी मिळावी म्हणून तिव्र आंदोलन छेडणार आहेत असा इशारा महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी दिला आहे.