वाळू माफीयांचे वऱ्हाड आणले पोलीस स्टेशनला, भडगाव पोलीसांची मोठी कारवाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२४
भडगाव तालुक्याला गिरणा व तितूर नदीची नैसर्गिक देणगी मिळाली असून यापैकी गिरणा या नदीच्या पात्रात वाहून येणाऱ्या वाळूला आज सोन्याचा भाव मिळत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणून या चांगल्या प्रतीच्या वाळूचा गोरखधंदा करतांना शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या रात्रीच्यावेळी जे. सी. बी. च्या साह्याने कमी वेळात वाहने भरुन ती वाहने भरधाव वेगाने पळवून नेत वाळूची विक्री केली जात आहे.
ही वाळूची चोरटी वाहतूक थांबण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून भडगाव पोलीसांनी रात्रीची गस्त घालत असतांना सकाळी, सकाळी विना नंबर प्लेट असलेले वाळूने भरलेले पाच ट्रॅक्टर व तीन मोटारसायकल ताब्यात घेऊन त्यांच्यावर रितसर कारवाई केली आहे. ही कारवाई करतांना वाळू माफियांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. मात्र भडगाव पोलीसांनी कुणाच्याही दबावाखाली न येता थेट कारवाई करत वाळूसह ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून भडगाव पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.
सदरच्या कारवाईत वरिष्ठांच्या आदेशानुसार भडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय जाधव, निलेश ब्राम्हणकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण परदेशी, कुंदन राजपूत, संदीप सोनवणे, सुनील राजपूत यांचा समावेश होता.
***************************************************
यापुढेही कारवाई सुरुच रहाणार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के.
***************************************************
विना नंबरप्लेट विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारांवर यापुढेही कारवाईचा धडाका सुरुच रहाणार असल्याचे भडगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांनी सांगितले आहे.