पाचोरा तालुक्यात तलाठी, सर्कल व महसूल विभागातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संमतीने गौण खनिजाची अवैध उचल, जे. सी. बी, ट्रॅक्टर मालकांची चांदी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२४
पाचोरा तालुक्यात वाळू माफियांच्या सोबतच गौण खनिज माफियांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून यात ज्यांच्याकडे स्वमालकीचे जे. सी. बी, ट्रॅक्टर, डंपर आहे अशा लोकांनी संघटीत होऊन टोळ्या जमवून एकजुटीने एकत्र येऊन गौण खनिज उत्खनन करुन ते विक्री करुन दररोज लाखो रुपये कमावत असून यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून या गौण खनिज उत्खनन व उचल करुन विक्री करणाऱ्या टोळ्यांना तलाठी, सर्कल व महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी अभय देत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कारण पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील गायरान जमिनी, गावठाण जमीन, गावाच्या आसपास पडीत असलेले शासनाच्या मालकीची भुखंड तसेच गाव शिवारातील नालाबांध, नालाबडींग, पाझर तलाव, राखीव जंगलात शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता तसेच रॉयल्टी न भरता जे. सी. बी. च्या साह्याने अवैधरित्या खोदकाम करुन या ठिकाणाहून मुरुम, माती, दगड या गौण खनिजाची उचल करुन परस्पर विक्री करुन दररोज लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता खेड्यापाड्यातील तसेच शहरातील घरांचे बांधकाम करतांना भराव करण्यासाठी मुरुम तसेच पाया भरण्यासाठी लागणारा दगड व माती याची मागणी वाढली आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्ते, शेत शिवारातील रस्ते, इतर जिल्हा मार्ग व महामार्गासाठी भराव करण्यासाठी लागणारा मुरुमाची मागणी वाढली असून याचाच फायदा घेऊन काही भांडवलदारांनी पैशांच्या जोरावर जे. सी. बी. ट्रॅक्टर, डंपर घेऊन दगड, माती व मुरुम विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे.
परंतु हा व्यवसाय करत असतांना गावपातळीवर स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल, तहसील कार्यालय यांच्याकडून रितसर परवानगी घेऊनच योग्य ठिकाणाहून योग्य वेळेत गौण खनिज उत्खनन करुन ते वाहून नेण्यासाठी बंधनकारक आहे. मात्र हे सगळे नियम धाब्यावर बसवून (काही) भ्रष्ट तलाठी, सर्कल व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी अनाधिकृतपणे उत्खनन करुन मुरुम माती व दगडाचा उचल केला जात आहे.
या अवैध उत्खननामध्ये एका बाजूला शासनाचा महसूल बुडत असून दुसरीकडे गावठाण, गायरान जमिनी, राखीव जंगलातील तसेच गावाजवळील भुखंड नष्ट होत चालले आहेत. सोबतच राखीव जंगलात तसेच गायरान जमिनीवर खोदकाम केले जात असल्याने वनराई झपाट्याने कमी होत चालली असून पशुधन पालकांना आपली गुरेढोरे चारण्यासाठी जंगल नसल्याने दुभती जनावरे झपाट्याने कमी होत चालली आहेत.
म्हणून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या, ज्या गाव, परिसरातील गायरान जमिनी, गावठाण जमीन, गावाच्या आसपास पडीत असलेले शासनाच्या मालकीची भुखंड तसेच गाव शिवारातील नालाबांध, नालाबडींग, पाझर तलाव, राखीव जंगलात शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेता तसेच रॉयल्टी न भरता जे. सी. बी. च्या साह्याने गौण खनिज उत्खनन करुन विनापरवानगी उचल सुरु आहे. अशा भागातील ग्रामपंचायत व महसूल विभागातील (भ्रष्ट) अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करुन हे सुरु असलेले अवैध उत्खनन त्वरित थांबवावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.