माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१२/२०२४
माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. २००४ ते २०१४ ते भारताचे पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर आणि गांधी परिवाराचे नसलेले ते दीर्घकाळ पंतप्रधान होते.
१०९१ साली देशावर आर्थिक संकट आलं होतं, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. १९९१ साली सिंग यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला आणि देशावरचे आर्थिक संकट दूर केले होते.
मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ साली पश्चिम पंजाबच्या गहमध्ये झाला. फाळणीनंतर सिंग यांचे कुटुंब भारतात आले. खुप लहान असताना सिंग यांच्या आईचे निधन झाले. सिंग यांचे पालनपोषण आजीने केले. १९५२ साली सिंग यांनी भारतात अर्थशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. इंडियाज एक्सपोर्ट कॉम्पिटेटिव्हनेस विषयातून त्यांनी ऑक्सफोर्डमधुन पी. एच. डी. मिळवली. १९८२ ते १९८५ दरम्यान ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
२००४ साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर मनमोहन सिंग हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले. पुढे २००९ ला काँग्रेसला पुन्हा सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळात मनरेगा, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार सारखे कायदे पारित झाले.
२०१६ साली मोदी सरकारने नोट बंदी केली. तेव्हा नोट बंदी म्हणजे सामूहिक लूट आहे अशा शब्दांत सिंग यांनी राज्यसभेत टीका केली होती.
सिंग यांनी १९९९ साली लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. सिंग हे सातत्याने राज्यसभेवर निवडून येत होते. १९९८ ते २००४ पर्यंत अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते, तेव्हा सिंग हे विरोधी पक्षनेते होते.