निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार !

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२४
पाचोरा, भडगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे १४ वे वार्षिक स्नेहसंमेलन निर्मल स्कूलच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय दिमाखदार पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या १४ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अतिथी व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करुन श्रीगणेश वंदना म्हणून करण्यात आली. तदनंतर आपले मनोगत व्यक्त करतांना निर्मल स्कूलच्या अध्याय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की वाचन व अभ्यास करत असतांनाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आभ्यासासोबतच वकृत्व, खेळ, नृत्य, गायन, वादन या आवडी जोपासणे गरजेचे आहे. कारण मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक बल वाढते तसेच वकृत्व, गायन, वादनाने आपल्यात नवचैतन्य निर्माण होऊन ताणतणाव कमी होतो. तसेच सद्यस्थितीत अल्पवयीन मुलांसह लहान, थोर मंडळी मोबाईलच्या अधीन झाली असल्याने लहान मुले व तरुणवर्ग मैदानी खेळांपासून लांब चालली असून जे खेळ मैदानावर खेळायला पाहिजे ते खेळ मोबाईल तासंतास खेळत असल्याने मान, पाठ, डोळे व मेंदूवर विपरीत परिणाम होत आहेत म्हणून कुटुंबप्रमुखांनी काळजी घेऊन शक्य होईल तेवढे आपल्या पाल्यांना मोबाईल पासून लांब ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले.
तदनंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्याविष्कार व कलांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्याविष्कार व कलांचे सादरीकरण करत वेगवेगळ्या भाषेत सुत्रसंचलन करुन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का देत मंत्रमुग्ध केले. या नृत्याविष्काराची विशेष बाब म्हणजे बोबड्या बोलीत लहान, लहान मुलांनी आपल्या कला सादर केल्याने भल्याभल्यांच्या मनात आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.
याप्रसंगी निर्मल सीडसचे महाव्यवस्थापक श्री. सुरेश पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उपाध्यक्षा श्रीमती कमलाताई पाटील, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व पाल्यांचे कौतुक करण्यासाठी पालकांनी प्रचंड गर्दी केली होती.