पाचोरा व शेंदुर्णी शहरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी ? पक्षीप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा पोलीस प्रशासनाला खडा सवाल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२४
मकरसंक्रांत जवळ येताच पंधरा दिवस अगोदरपासूनच आकाशात पंतग उडतांना दिसून येतात. परंतु पतंग उडवतांना आपला पतंग जास्तीत, जास्त उंचीवर कसा नेता येईल याची स्पर्धा सुरु होते. व याच स्पर्धेत कमी वजनाचा व दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी काचेचा बारीक कस लाऊन तसेच चिनी बनावटीच्या प्लास्टिक नायलॉन धाग्याचा मांजा वापरला जातो. परंतु आपल्या छंदात आपण नायलॉन व काचेचा बारीक कस लाऊन जो मांजाचा वापर करुन पतंग उडवतांना पतंग उडणाऱ्यांच्या हाताला तसेच आसपासच्या लोकांना या नायलॉन मांजाने जखमा होतात. तसेच आकाशात उडणारे पक्षी जखमी होऊन तर कधी पंख किंवा गळ्यावर जखम होऊन कित्येक पक्षी व प्राणी मृत्यूमुखी पडतात. तसेच पतंग उडवून झाल्यानंतर हा नायलॉन मांजा जमीनीवर पडून असतो व हा नायलॉन मांजा जैवविघटनशील नसल्याने नद्या, नाले, ड्रेनेज लाईन, पाण्याचे नैसर्गिक मार्ग यात पडून याचा विपरीत परिणाम होतो. तसेच मातीमध्ये व उघड्यावर पडल्या अन्नपदार्थातून नायलॉन मांजा गायी, म्हशी, शेळ्या व इतर प्राण्यांच्या पोटात जातो व फॉरेन बॉडी म्हणजे जनावरांच्या पचनक्रियेत बिघाड होऊन जनावरांचे पोट फुगून यात ते दगावतात.
म्हणून राज्य सरकारने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या नायलॉन मांजाची विक्री करण्यावर व वापरावर बंदी घातली आहे. मात्र तरीही आजच्या परिस्थितीत कायदा धाब्यावर बसवून पाचोरा व शेंदुर्णी शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून जनरल स्टोअर्स, किराणा दुकान, पानटपरी, गोळ्या बिस्किटे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी राज्य सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करुन काही ठिकाणी लपून, छपून तर काही ठिकाणी भरचौकात उघड्यावर विक्री करत असल्याचे दिसून येते.
*****************************************************
जबाबदार अधिकारी व पोलीस कारवाई करतील का ? पक्षीप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा सवाल.
*****************************************************
राज्य सरकारने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या नायलॉन मांजाची विक्री करण्यावर कारवाई करण्याची तरतूद केली असून या कायद्यानुसार प्लास्टिक नायलॉन मांजा विक्री किंवा वापर करणाऱ्या व्यक्तीला एक वर्षासाठी कारावास किंवा दंडाची तरतूद केली असतांनाही जळगाव शहरासह पाचोरा व शेंदुर्णी शहरात तसेच खेड्यापाड्यातील प्लास्टिक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय जबाबदार अधिकारी व पोलीस विभागामार्फत कारवाई का केली जात नाही असा प्रश्न पक्षीप्रेमी तसेच पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.