पाचोरा तालुक्यात ई पॉश मशिन घोटाळा, गोरगरीबांच्या वाट्यावर येणाऱ्या धान्याचा काळाबाजार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२४
मागील महिन्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आजपर्यंत सगळीकडे ई. व्ही. एम. मशिन मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या ई. व्ही. एम. मशिन बाबत खरे काय आणि खोटे काय हे देवच जाणे असे म्हणावे लागेल कारण सर्वसामान्य जनतेच्या नशिबी फक्त आणि फक्त पाच वर्षात एकवेळ मतदान करुन येणारी पाच वर्षे स्वप्नांच्या दुनियेत जगावे लागते कारण निवडणूक काळात गोरगरीबांच्या समस्यांचे भांडवल करुन मते मिळवून सत्तेवर आल्यानंतर हे नेते मंडळी सगळ काही विसरतात व गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न तसाच राहुन जातो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
परंतु याहुन ही मोठा घोटाळा पाचोरा शहरासह संपूर्ण पाचोरा तालुक्यात सुरु असून या घोटाळ्याच्या माध्यमातून गोरगरीबांना दोन वेळचे जेवण मिळावे या हेतूने शासनामार्फत प्रत्येक कुटुंबाला दरमहा शासनमान्य धान्य दुकानातून गहू, तांदूळ, ज्वारीचे वाटप केले जाते. हे वाटप करतांना काळाबाजार होऊ नये व धान्य वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना ई पॉश मशिन दिले असून या ई पॉश मशिनवर रेशनकार्ड धारकांचा अंगठा घेऊन शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे धान्य वाटप करणे गरजेचे आहे. परंतु रेशनिंग दुकानदारांनी ई पॉश मशिन मध्ये घोटाळा करुन तर कधी मनमानी करुन लाभार्थ्यांना पुरेपूर धान्य वाटप न करता ते धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे धान्य वाटपात भ्रष्टाचार होणार नाही म्हणून ई पॉश मशिन अमलात आणल्यानंतर स्वस्त धान्य दुकानादारांसाठी हे ई पॉश मशिन डोकेदुखी ठरत आहे. कारण ई पॉश मशिनवर रेशनकार्ड धारकांनी अंगठा ठेवल्यानंतर त्यांच्या रेशनकार्ड मध्ये असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार किती धान्य मिळते याची पावती ई पॉश मशिन मधुन बाहेर येते व त्या पावती प्रमाणे रेशनकार्ड धारकांना धान्य देणे बंधनकारक असल्याने आता धान्य वाटपात काळाबाजार करणे सहजासहजी शक्य होत नाही असे वाटत असेल तरीही आजही धान्य वाटप करतांना मोठ्या प्रमाणात घोटाळा केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता धान्य वाटपात काळाबाजार करण्यासाठी काही स्वस्त धान्य दुकानदारांनी नामी शक्कल लढविली असून यात ते रेशनकार्ड धारक लाभार्थी धान्य घेण्यासाठी आल्यावर ई पॉश मशिनवर त्याचा फक्त अंगठा घेऊन रितसर पावती न देता धान्य वाटप करत आहेत. हा प्रकार पाहून रेशनकार्ड धारकांनी जर पावती मागितली तर ई पॉश मशिन मध्ये कागदी रोल शिल्लक नाही, कागदी रोल आहे परंतु मशिन मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे पावती निघत नाही किंवा सर्व्हर डाऊन आहे म्हणून पावती देण्यासाठी अडचण येत असे सांगितले जाते व लाभार्थ्यांना पुरेपूर धान्य वाटप केले जात नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
याबाबत रेशनिंग दुकानांच्या संचालकांना विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढून नेत आहेत. मात्र याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता धान्य वाटपात घोटाळा करण्यासाठी रेशनिंग दुकानाचे संचालक मुद्दामहून ई पॉश मशिन खराब झाले आहे, कागदी रोल शिल्लक नाही, सर्व्हर डाऊन आहे अशी कारणे सांगून रेशनकार्ड धारकांनी जास्तच प्रश्न विचारल्यास पटेल तर घ्या नाहीतर राहु द्या, तुम्हाला पटेल तेथे तक्रार करा पुरवठा विभाग व तेथील अधिकारी व कर्मचारी आमचेच आहेत आम्ही त्यांना दरमहा हप्ते देतो म्हणून आमचं काहीच होणार नाही. उलट तुमचेच रेशनकार्ड बंद होईल अशी बतावणी करत आहेत.
यामुळे गोरगरीबांच्या वाट्याला येणारे धान्य शासनाने दिलेल्या नियम व अटी प्रमाणे वाटप न करता वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ करुन हे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते अशी माहिती समोर येत असून अशा मनमानी कारभार करणाऱ्या व पावती न देणाऱ्या रेशनिंग दुकानांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्रस्त रेशनकार्ड धारकांनी केली आहे.
*पुढील भागात*
१५००/०० ते ३०००/०० रुपये द्या व रेशनकार्ड घ्या, पुरवठा विभागातील दलालांचा जाहीर फतवा.