तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना २४ तासात अटक, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२४
धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाळू माफीयांनी जिवघेणा हल्ला केला होता. या हल्यात वाळू माफिया आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी यांनी पथकात कर्तव्यावर असलेले तलाठी दत्तात्रेय पाटील यांच्यावर जिवघेणा हल्ला चढवून त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे त्यांच्या पायाला अस्थिभंग होऊन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
या हल्ल्या प्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी यांनी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाळधी दुरक्षेत्र व स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या.
या सुचनेनुसार दुरक्षेत्र पाळधी व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन ट्रॅक्टर सह हल्ल्यातील आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांना २४ तासांच्या आत अटक केली असून आरोपींविरुद्ध १०९, १३२, १२१(२), ३०३(२), ११२(२), १८९(२), १९१, १९० कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
***************************************************
वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन कठोर पावले उचलणार, जिल्हाधिकारी मा. आयुष्य प्रसाद.
***************************************************
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांनी तातडीने धरणगाव येथे घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्हाभरात वाळू माफियांनी धुडगूस घातला असून वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन वाळू माफियांच्या विरोधात प्रशासन कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री व विभागीय आयुक्तांनी या घटनेची दखल घेत संबंधित विभागाला वाळू माफियांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.