बनावट दस्तऐवज तयार करुन खुल्या भुखंडाची परस्पर विक्री, दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२४
बनावट दस्तऐवज तयार करुन खुल्या भुखंडाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन संशयितांना पाचोरा पोलीसांनी अटक करुन पाचोरा न्यायालयात हजर केले असता संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास अनोळखी महिलेसह पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील पुंडलिक काशिनाथ पाटील व लोहारी येथील अक्षय आधार बडगुजर यांनी संगनमत करुन शितल सुनील पाटील यांच्या नावाने ४५७९५४०६६२६४ या क्रमांकाचे आधार कार्ड बनवून या आधार कार्डवर मुळ शितल पाटील यांच्या छायाचित्राऐवजी अन्य महिलेचे छायाचित्र वापरुन ते खरे आहे असे भासवून शितल पाटील यांच्या जागेवर तोतया महिला उभी करीत ६९५७/२०२४ या क्रमांकाचे बनावट दस्त बनवून शासनासह खुल्या भूखंडाच्या मूळ मालक शितल सुनील पाटील यांची तसेच ६९५७/२०२४ क्रमांकाचे दस्त लिहून घेणाराची सुमारे २८५०००/०० रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी सतेज सखाराम भारस्कर यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला अनोळखी महिलेसह पुंडलिक काशिनाथ पाटील व अक्षय आधार बडगुजर यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी पुंडलिक पाटील व अक्षय बडगुजर यांना दिनांक १६ डिसेंबर २०२४ सोमवार रोजी ताब्यात घेऊन १७ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी पाचोरा न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.