जामनेर व पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन कजगाव येथे लाकडाची रवानगी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२४
जामनेर व पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची अवैधरित्या कत्तल केली जात असून या अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या लाकडांची रात्रीच्यावेळी ट्रक मधून चोरटी वाहतूक करुन ही लाकडे पाचोरा तालुक्यातील भोजे व भडगाव तालुक्यातील कजगाव येथे रात्रीच्या अंधारात पाठविण्यात येत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता जामनेर व भडगाव तालुक्यातील शेत शिवारात तसेच राखीव जंगलात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून हे लाकुड व्यापारी शेतकऱ्यांना भेटून झाडे विकत घेऊन हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या अवैधरित्या कत्तल करत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या नजरेत धुळफेक करत राखीव जंगलातील वनसंपदेची लुट करत आहेत अशी माहिती समोर येत आहे.
तसेच वनविभागाचे काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे आर्थिक देवाणघेवाण करुन या लाकुड व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला असून लाकुड वाहतूक करणारी वाहने पकडून देण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला तर ते उडवाउडवीची उत्तरे देऊन लाकडाचे भरलेले ट्रक पकडण्यासाठी टाळाटाळ करतात अशी माहिती निसर्गप्रेमींनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून दिली आहे.
तसेच एकाबाजूला शासन वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतांनाच दुसरीकडे हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने अवैध वृक्षतोड करणारे व्यापारी व यांना पाठीशी घालणारे वनविभागाचे व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व वृक्षतोड थांबण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.