लाडक्या बहिणी तुपाशी तर लाडके भाऊ उपाशी, काली, पीली व रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/१२/२०२४
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. अशाच योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहिण योजना व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०९ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजनेची घोषणा करत या योजनेअंतर्गत महिलांना एस. टी. प्रवासात ५०% भाडे सवलत जाहीर केली तेव्हापासून महिलांनी एस. टी. मधुन प्रवास सुरु केल्यावर महिलांना व एस. टी. ला सुगीचे दिवस आले आहेत.
मात्र दुसरीकडे काली, पिली व तीनचाकी खाजगी रिक्षा चालकांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. कारण महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ५०% भाडे सवलत दिली आहे. तसेच जेष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात सवलती देण्यात आल्या असल्याने काली, पीली व तीन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे प्रवासी ढुंकूनही पाहत नसल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपल्या महाराष्ट्रात काली, पीली व तीन चाकी रिक्षा घेऊन प्रवासी वाहतूक करणारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कारण नोकरी मिळत नाही म्हणून बऱ्याचशा उच्चशिक्षित तरुणांनी कर्ज काढून राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासी वाहतूकीसाठी रितसर परवानगी घेऊन त्यांच्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करत शासनाला कर भरुन लाखो रुपये किंमतीची वाहने विकत घेऊन खाजगी प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय सुरु केला आहे.
परंतु महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एस. टी. प्रवास भाड्यात ५०% सुट दिल्यापासून काली, पीली व तीन चाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रवासी मिळत नसल्याने दैनंदिन लागणारा खर्चही निघत नसल्याने कर्जाने घेतलेल्या वाहनाचा हप्ता भरण्यासाठी रक्कम शिल्लक नाही तसेच स्वताचे पोट भरने मुष्किल झाले असल्याने कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा हा प्रश्न निर्माण झाला असून वाहनधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती पाहता ‘लाडक्या बहिणी तुपाशी तर लाडके भाऊ उपाशी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.