धटाई खाये मिठाई, गरिब खाये खाये गचांड्या, श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या लबाडांचा अजब फंडा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२४
पाचोरा तालुक्यात श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या नावाखाली भाग्यवान ग्राहकांना विविध महागड्या वस्तू विक्रीसाठी एक योजना अमलात आणली होती. या योजनेच्या माध्यमातून १५००/०० रुपये किंमतीचे कुपन देऊन ग्राहक बनवण्याची शक्कल लढवून या श्री. एंटरप्राईजेस कडून एकूण ५५५५ ग्राहकांना कुपन विक्री करण्यात आले आहेत. या कुपन विक्रीतून १५००/०० रुपये प्रति कुपन प्रमाणे ५५५५ कुपन विक्री करुन ८,३३२,५०० इतकी रक्कम जमा करुन कुपन धारकांना कोणताही परतावा न देता फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर फसगत झालेल्या काही कुपन धारकांनी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही कारवाई केली जात नसल्याने श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या या बोगस स्कीम चालकांनी तक्रारदारांना भेटून ठराविक लोकांनाच पैसे परत केले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून बाकीचे हजारो हतबल झाले असून ‘धटाई खाये मिठाई, गरिब खाये गचांड्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने कुपन धारक लवकर पाचोरा पोलीस स्टेशन वर निवेदन देण्यासाठी धडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कुपन विक्री झाल्यानंतर पाचोरा ते वरखेडी रस्त्यावर पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता भाग्यवान ग्राहकांसाठी सोडत ठेवण्यात आली होती. याठिकाणी कुपन घेतलेले भाग्यवान ग्राहक आपले नशीब आजमावण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोडतीच्या ठिकाणी ही योजना अमलात आणणारे अरुण आहेर, फरीद शेठ, संजय पाटील व इतर शुभचिंतक उपस्थित होते अशी माहिती फसवणूक झालेल्या कुपन धारकांनी दिली आहे.
या साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे कुपन घेतलेल्या ग्राहकांनी मनात वेगवेगळी स्वप्न रंगवत सकाळी अकरा वाजेपासून हजेरी लावली होती. याठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या कुपन ग्राहकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा अन्य कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने या कुपन घेतलेल्या ग्राहकांच्या घशाला कोरड पडली होती मात्र आपल्याला १५००/०० रुपयात चांगल्या मोठ्या किंमतीचे बक्षीस मिळेल या आशेवर सर्व ग्राहक थुंकी गिळून वेळ काढून नेत होते.
परंतु दुपारी एक वाजेल भाग्यवान ग्राहकांसाठी सोडत ठेवण्यात आली असली तरी दोन वाजेपर्यंत ही भाग्यवान ग्राहक योजना अमलात आणणारे मुख्य व्यक्ती आले नाहीत व मग कुपन घेतलेल्या ग्राहकांनी या साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे अरुण आहेर, फरीद शेठ व संजय पाटील हे उपस्थित असलेल्या जबाबदार लोकांना विचारणा केली असता थोडे थांबा ते येतील, ते येतील असे सांगून वेळ काढून नेत होते तसेच अरुण आहेर, फरीद शेठ व संजय पाटील संबंधितांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून लवकर या असे सांगत होते.
जास्त उशीर होत असल्याने कुपन धारकांनी उपस्थित लोकांना धारेवर धरले व संताप व्यक्त केला. याच कालावधीत या योजनेच्या मुख्य सुत्रधारांनी आपले भ्रमणध्वनी बंद करुन पोबारा केल्याचे लक्षात आल्यानंतर साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे उपस्थित असलेले अरुण आहेर, फरीद शेठ व संजय पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली व आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले व आता या जमलेल्या कुपन धारकांना काय उत्तर द्यावे म्हणून त्यांनी साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथून पळ काढला.
ही घटना घडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे कुपन घेतलेल्या ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला व आता काय करायचे याबाबत चर्चा केली व कुपन घेतलेल्या ग्राहक सरळ, सरळ पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करणार होते मात्र या फसव्या योजनेत सहभागी असलेल्या काही पांढरपेशा लोकांनी कुपन घेतलेल्या काही कुपन धारकांना दमदाटी करुन तर काही कुपन धारकांची मनधरणी करत व काहींना कुपनचे घेतलेले पैसे परत करुन झालेल्या घोटाळ्यावर पडदा टाकला आहे. मात्र अजूनही कुपन घेऊन फसवणूक झालेल्या हजारो ग्राहकांना पैसे परत मिळाले नसल्याने ते लवकरच मा. जिल्हा पोलिस अधीक्षक यांना भेटणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
***************************************************
श्री. लक्ष्मी एंटरप्राईजेसचा टांगा पलटी घोडे फरार, फसवणूक प्रकरण दडपणारेच बनले मालदार.
***************************************************
श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेस कडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुपन घेतलेल्या हजारो ग्राहकांनी एकच कल्लोळ केला व कुपन विक्रेते व मध्यस्थी लोकांना धारेवर धरले ही वार्ता पाचोरा शहरासह तालुक्यात पसरली व सगळ्यांनी साई मोक्ष रिसॉर्ट अँड लॉन्स येथे धाव घेतली परंतु तोपर्यंत श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसचे तोतया एजंट फरार झाले होते. कुपन घेतलेल्या काही लोकांना पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले मात्र काही प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पांढरपेशा दलालांनी ही योजना अमलात आणणाऱ्या लोकांकडून लाखो रुपये घेऊन मध्यस्थी करुन बोटावर मोजण्याइतक्या कुपन धारकांना त्यांचे पैसे परत करुन झालेल्या घोटाळ्यावर पडदा टाकला असल्याने अद्यापही पोलीसात तक्रार दाखल नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असे असले तरी अद्यापही हजारो कुपन धारकांना अद्यापही त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने काही कुपन धारकांनी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. मात्र पाचोरा पोलीस स्टेशन कडून काय कारवाई करण्यात येणार आहे किंवा काय कारवाई केली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर येत नसल्याने व पोलीस कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत असल्याने संबंधित लकी ड्रॉ काढणाऱ्या व्यक्तीने व कुपन विक्रेत्यांनी मर्जीतील लोकांचे पैसे परत दिले आहेत. मात्र इतर हजारो कुपन विकत घेणाऱ्या लोकांचे लाखो रुपये घेऊन पसार झालेल्या या स्कीम मध्ये सामील असलेल्या लोकांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.