वरखेडी परिसरात अंगणवाडी शालेय पोषण आहारातील पिवळ्या तांदूळाचा काळाबाजार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या एका ठिकाणी शालेय पोषण आहारातील पिवळ्या तांदूळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या होत असलेल्या काळ्या बाजाराचे व तांदूळ साठवणूक व त्यावर प्रक्रिया करतांना तसेच पुन्हा पॅकिंग करतांनाच्या काही चित्रफीत व छायाचित्र सत्यजित न्यूजला हाती लागले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या एका व्यवसायिकाकडे तांदूळ खरेदी, विक्री करण्याची रितसर परवानगी आहे. परंतु याठिकाणी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या तांदूळाची खरेदी केली जात नसून याठिकाणी दिवसाढवळ्या रेशनिंगचा व अंगणवाडी शालेय पोषण आहारातील पिवळ्या रंगाचा तांदूळ मोठ्या प्रमाणात आणून त्यावर प्रक्रिया करुन पुन्हा तोच तांदूळ बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे या व्यवसायीकाविषयी बऱ्याचशा चर्चा ऐकायला मिळत असून मागील काळात काही सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी जाणाऱ्या रेशनिंगच्या तादूळाचा ट्रक पकडून दिला होता मात्र त्यावेळी या प्रकरणावर नाट्यमय रित्या पडदा टाकण्यात आला होता. यामुळे संबंधित व्यापाऱ्याची हिम्मत वाढली असून आता त्याने अंगणवाडी शालेय पोषण आहारातील तांदूळ खरेदी करण्याचा धंदा सुरु केला असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत.
तांदूळाचा होणारा काळाबाजार व याकडे दुर्लक्ष करणारे जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचा लवकरच भांडाफोड केला जाणार यात शंका नाही.
सविस्तर वृत्त पुढील भागात.