ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १० वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, चालकाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२४
पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर असलेल्या शक्ती धाम जवळ आज सायंकाळी अंदाजे साडे चार ते पावणे पाच वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून एका दहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेबाबत जितेंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरुन पुनगाव येथील ट्रॅक्टर चालक विजय उर्फ बबलू अशोक थोरात याच्या विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हे करीत आहेत.
या अपघाताबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर असलेल्या राजीव गांधी कॉलनीमध्ये जितेंद्र गोसावी हे पत्नी, दोन मुले व आईसह वास्तव्यास आहेत. जितेंद्र गोसावी यांच्या दोन मुलांपैकी मोठा मुलगा रुद्र गोसावी (वय वर्षे १०) हा कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात इयत्ता तीसरी मध्ये शिक्षण घेत होता. दिनांक १३ डिसेंबर २०२४ शुक्रवार रोजी शाळा सुटल्यानंतर रुद्र सायकल घेऊन शक्ती धामच्या दिशेने जात असतांनाच समोरुन भरधाव ट्रॅक्टर येत होते. भरधाव ट्रॅक्टर पाहून रुद्र हा घाबरला व त्याचा सायकली वरचा ताबा सुटला हे दृष्य पाहून ट्रॅक्टर चालक भांबावून गेल्याने ट्रॅक्टर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच रुद्र हा मोठ्या चाकाखाली सापडला रुद्रच्या डोक्यावरुन मोठे चाक गेल्याने रुद्रच्या डोक्याची कवटी फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात घडताच आसपासच्या लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत रुद्रची प्राणज्योत मालवली होती. ही वार्ता रुद्रच्या आईवडीलांना माहीत पडताच त्यांनी हंबरडा फोडत घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत पुनगाव येथील मुकेश पाटील यांनी रुद्रचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पाचोरा येथील शासकीय रुग्णालयात आणला होता. शासकीय रुग्णालयात रुद्रचा मृतदेह पाहून तसेच त्याच्या आईवडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे व पंचनाम्यासाठी आलेल्या पोलीसांचे डोळे पाणावले होते.
****************************************************
सकाळी व सायंकाळी भडगाव रस्ता ते पाचोरा शहर या रस्त्यावर ट्रॅक्टर व अवजड वाहनांना बंदी घालावी.
*****************************************************
पाचोरा व भडगाव तालुक्याला मोठमोठ्या नद्यांची नैसर्गिक देणगी मिळाली असून या नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे. यात विशेष म्हणजे शासनाचा महसूल बुडवून वाळू तसेच माती, मुरुम व इतर गौण खनिज वाहतूक करतांना आपले ट्रॅक्टर किंवा डंपर महसूल विभाग किंवा पोलीसांना सापडू नये म्हणून हे गौण खनिज भरलेले ट्रॅक्टर किंवा डंपर रात्रीच्या वेळी तसेच सकाळी चार वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी चार वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत भरधाव वेगाने पळवून नेले जातात व यातूनच अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जात आहे.
म्हणून संध्याकाळपासून तर सकाळी अकरा वाजेपर्यंत भडगाव रस्त्यावरुन पाचोरा शहरात येणारे ट्रॅक्टर, डंपर व अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. कारण पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर जास्तीत, जास्त शैक्षणिक संस्था असल्याकारणाने या रस्त्यावर सकाळ व सायंकाळच्या सुमारास शाळेत जाणारे व शाळेतून घरी येणारे विद्यार्थी तसेच सकाळ, संध्याकाळ व्यायाम करणारे व शतपावली करणारांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते व याच वेळात हे अवैध गौण खनिज उत्खनन करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर भरधाव वेगाने याच रस्त्यावर पळवले जातात यामुळे आजपर्यंत बऱ्याचसे अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. म्हणून सायंकाळी सहा वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावर ट्रॅक्टर व डंपर या वाहनांना बंदी घालावी अशी मागणी पाचोरा शहरवासीयांनी केली आहे.