शिंदे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पैसे मिळत नसल्याने लाडक्या बहिणी हिरमुसल्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२४
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा असून महाराष्ट्र राज्यातील दीड कोटी पेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. कारण शिंदे सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. तसेच या योजनेत ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना शिंदे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जात आहेत.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना सरकारकडून दर महिन्याला १५००/०० रुपयांची आर्थिक मदत केली जात असून या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत तीन हप्त्यांचे ४५००/०० रुपये व मतदान मिळवून घेण्यासाठी आचारसंहिता लागण्याआधी दोन महिन्यांचे ३०००/०० रुपये आगाऊ रक्कम मिळून महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत ७५००/०० रुपये आले आहेत. तसेच निवडणूक काळात सरकारतर्फे दिवाळीनिमित्त लाभार्थी महिलांना खुष करण्यासाठी ५५००/०० रुपयांचा बोनस देणार असल्याची चर्चा जनमानसातून ऐकायला मिळत होती.
यामागील कारण म्हणजे राज्यभरात दिवाळी सणाचा उत्साह व्दिगुणित व्हावा म्हणून शासकीय व खाजगी नोकरवर्गाला बोनस दिला जातो त्याच प्रमाणे सर्वसामान्य गृहिणींचा दिवाळी हा सण आनंदात साजरा करण्यासाठी महायुती सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी ३०००/०० रुपये बोनस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे दिवाळी सणाच्या अगोदर देणार होते. तसेच राज्य सरकार काही निवडक महिला व मुलींच्या बॅंक खात्यात २५००/०० रुपये अधिक असे एकूण ५५००/०० रुपये बोनस जाहीर केले होते. विशेष म्हणजे ही रक्कम लाडक्या बहिणीला दरमहा मिळणाऱ्या १५००/०० रुपयांच्या व्यतिरिक्त देण्यात येणार होती. मात्र आता निवडणुका पार पडल्या व दिवाळी सणही पार पडला मात्र अद्यापही जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना बोनसची रक्कम तसेच पुढील महिन्याची १५००/०० रुपये रक्कम मिळालीच नाही.
यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारने लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली व मतदान पदरात पाडून घेण्यासाठी काही महिन्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकून व बोनस देणार असल्याचे जाहीर करुन मते मिळवून सत्ता मिळवून घेतली अशी टिका विरोधकांकडून सातत्याने केली जात होती व केली जात आहे. व लाडक्या बहिणींना ७५००/०० रुपये मिळाले असल्याने विरोधकांकडून केली जाणारी टिका ही सत्ताधारी व विरोधी पक्षाचा हा राजकीय पक्षाचा स्टंट असल्याचे वाटत होते.
परंतु शिंदे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे मिळत नसल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पदरात मते पाडून घेण्यासाठी केलेली ही खेळी होती व आता मते मिळवून घेत सत्ता हातात आल्यानंतर महायुती व शिंदे सरकारने आमचा विश्वासघात केला की काय अशी शंका लाडक्या बहिणींच्या मनात घर करुन बसली असल्याने त्या आता हिरमुसल्या आहेत.