कुऱ्हाड शिवारात चोरांनी दिला शेतकऱ्याला झटका, बारा हजार रुपयांहून अधिक नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेतकरी उत्तम परभत न्हावी यांनी त्यांच्या शेतातील शेतमालाचे जंगली प्राण्यांपासून नुकसान होऊ नये म्हणून स्वयंचलित झटका मशिन बसले होते. झटका मशिन बसल्यामुळे उत्तम न्हावी यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होत होते मात्र दिनांक १२ डिसेंबर गुरुवार रात्री ते १३ डिसेंबर २०२४ शुक्रवार सकाळपर्यंतच्या कालावधीत कुणीतरी अज्ञात व्यक्तीने झटका मशिन चोरुन नेल्याची बाब आज सकाळी उत्तम न्हावी शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात आली आहे.
हे झटका मशिन चोरीला गेल्यामुळे शेतकरी उत्तम न्हावी यांचे १२ हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले असून पिकाच्या रक्षणासाठी पुन्हा झटका मशिन आणणे गरजेचे असल्याने त्यांना अजून १२ हजार रुपये खर्च करावा लागणार असल्याने उत्तम न्हावी यांचे एकुण २४ हजार रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच चोरांनी शेतकऱ्याला २४ हजार रुपयांचा झटका दिला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तसेच चोरट्यांची भीती कायम असल्याचे मत कुऱ्हाड परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले असून या भुरट्या चोरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
****************************************************
अवैध धंदे वाढल्याने भुरट्या चोरांचा सुळसुळाट.
****************************************************
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निमिर्ती व विक्री तसेच देशी दारुची अवैध विक्री राजरोसपणे, दिवसाढवळ्या, रात्रंदिवस, बिनबोभाटपणे सुरु असते विशेष म्हणजे पानटपरी, उपहारगृह, बसस्थानक, महत्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर व चौकाचौकात टपऱ्या उघडून हे व्यवसाय बिनधास्तपणे सुरु आहेत. यामुळे व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी चोऱ्या करतात म्हणून कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व पंचक्रोशीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिलावर्गाकडून केली जात आहे.