वृक्षतोड थांबण्यासाठी शाखामृग धडकले थेट तहसील कार्यालयावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१२/२०२४
पावसाळा संपतो ना संपतो तोच पाचोरा, जामनेर, सोयगाव, भडगाव तालुयासह सर्वदूर मोठ्या प्रमाणात महाकाय हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित यंत्राच्या साह्याने अवैध कत्तल केली जात असून या अवैध वृक्षतोडीकडे महसूल व वनविभागाचे कमालीचे म्हणण्यापेक्षा अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे मत निसर्गप्रेमींनी व्यक्त केले आहे.
कारण पाचोरा, जामनेर, भडगाव, सोयगाव, तालुक्यात शेत शिवार, तसेच राखीव जंगल तसेच काही सार्वजनिक मालकीच्या भुखंडावरील मोठमोठी महाकाय वृक्ष शासनाची तसेच वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेता स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दिवसाढवळ्या, बिनधास्तपणे कापली जात असल्याने सुज्ञ नागरिक व निसर्गप्रेमींनी चिंता व्यक्त करत ही सुरु असलेली अवैध वृक्षतोड त्वरित थांबवावी अशी मागणी केली आहे.
कारण या बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडले असून उन्हाळ्यात पावसाळा तर पावसाळ्यात उन्हाळा तर कधी बेमोसमी पाऊस व गारपीट होतांना आपण बघतो आहोत. तसेच वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले असून वातावरणातील ओझोन वायूचा स्थर कमी होऊन वातावरणातील उष्णतामान दिवसेंदिवस कमालीचे वाढत चालले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता एका बाजूला शासनाने वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन करण्यासाठी मोहीम हाती घेतली असली तरी भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही मोहीम फक्त आणि फक्त कागदावरच रंगवून घेत यात कोटी रुपयांचा निधी संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर हडप केल्यामुळे वृक्षलागवड व वृक्ष संवर्धन ही मोहीम यशस्वी झाली नाही.
तर दुसरीकडे निसर्ग संपदा वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींनी व विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन वनविभाग, महसूल विभाग यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार दाखल करुन तर कधी मोर्चे आंदोलने करुन निसर्ग संपत्तीचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी कुऱ्हाड बंदी तसेच दररोज होणारी हिरव्यागार वृक्षांची कत्तल त्वरित थांबवावी कायम पाठपुरावा केला मात्र महसूल विभाग व वनविभागाचे जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे अर्थपूर्ण देवाणघेवाण करुन डोळे असून आंधळे झाले आहेत.
यामुळे जंगलातील झाडे कमी होऊन पशु, पक्षांची संख्या घसरणीवर आली आहे. विशेष म्हणजे जे पक्षी व प्राणी जंगलात वास्तव्याला असतात त्यांची खाण्यापिण्याची व रहाण्याची व्यवस्था बिघडल्याने या जंगलातील पक्षी, प्राण्यांनी आपला मोर्चा शहरासह खेडेगावात वळवला आहे. अशीच एक माकडांची टोळी पाचोरा प्रांताधिकारी, तहसील व पोलीस स्टेशनच्या कार्यालयावर येऊन थांबली असून हे शाखामृग दिवसभर या कार्यालयाच्या भिंती, मुख्य प्रवेशद्वारावर दिसून येतात तर कधी, कधी कार्यालयात घुसतात व नळाचे पाणी पितात.
हे दृश्य पाहून असे वाटते की कदाचित जंगलातील अवैध वृक्षतोड थांबण्यासाठी ही माकडे महसूल विभाग व पोलीसांचे लक्ष वेधण्यासाठी कार्यालयावर येऊन प्रयत्न तर करत नसतील ना अशी शंका येते. म्हणून बुद्धिजीवी, संवेदनशील, भावनाशील अधिकारी व कर्मचारी या मुक्या प्राण्यांच्या भावना ओळखून नक्कीच वनसंपदा राखण्याची जबाबदारी पार पाडतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.