चाळीसगाव ते शिंदाड प्रवासादरम्यान शिंदाड येथील महिलेचे सात लाख ऐंशी हजाराचे दागिने लंपास.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२४
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात अराजकता माजली असून ठिकठिकाणी चोऱ्या, मारामाऱ्या, छेडखानी, अत्याचार व खुनाच्या घटना घडत आहेत. अशीच एक चोरीची घटना दिनांक ०९ डिसेंबर २०२४ सोमवार रोजी घडली असून या घटनेत पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील एक महिला, तीचा मुलगा व सुनेसोबत चाळीसगाव ते शिंदाड असा एस. टी. मधुन प्रवास करत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्या महिलेजवळ असले सात लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की शिंदाड येथील रहिवासी असलेल्या शोभाबाई अरुण पाटील ही महिला काल दिनांक ०९ डिसेंबर २०२४ सोमवार रोजी शिंदाड येथे मुळ गावी येण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकावर आली होती. बसस्थानकावर येतांना त्यांच्या मुलगा हर्षल हा त्यांच्या सोबत होता एस. टी. बसस्थानकावर आल्यानंतर ठिक तीन वाजून चाळीस मिनिटाला शोभाबाई व त्यांचा मुलगा पाचोरा येण्यासाठी नाशिक ते पाचोरा एस. टी. बस क्रमांक १८८४ या बसमध्ये चढत असतांनाच शोभाबाई यांच्या पुढे एक व्यक्ती व त्या वक्ती सोबत असलेली एक महिला शोभाबाई यांना मुद्दामहून आडवे झाले तेव्हा शोभाबाई सोबत असलेल्या त्यांच्या सुनबाईंचा हात दाबला गेला व हात दाबला गेल्याच्या कारणावरुन एस. टी. बसमध्ये चढत असतांनाच शोभाबाई यांच्या सोबत आसलेला त्यांचा मुलगा व पुढे असलेली व्यक्ती व मागे असलेल्या महिलेसोबत हर्षल याची बाचाबाची झाली होती.
तदनंतर प्रवासादरम्यान असे प्रसंग येतच असतात या हेतूने त्यांनी सामंजस्य दाखवून एस. टी. बसमध्ये बसून घेतले एस. टी. बसमध्ये हर्षलने शोभाबाई यांच्या बॅग व इतर सामान ठेवून हर्षल एस. टी. बसमध्ये बसला याच वेळी एस. टी. चालकाने गाडी वळवण्यासाठी मागे घेतली तेव्हा त्या एस. टी. बसमध्ये बसलेल्या तीन महिलांनी आम्ही चुकीच्या बसमध्ये बसलो आम्हाला खाली उतरु द्या असा आरडाओरडा करत त्या तीन महिला बसमधून खाली उतरल्या व बस चाळीसगाव येथून पाचोरा बसस्थानकावर आल्यानंतर शोभाबाई व त्यांचा मुलगा हर्षल हे खाली उतरले.
पाचोरा बसस्थानकावर उतरताच शोभाबाई यांना पाचोरा ते पिंपळगाव हरेश्वर शिंदाड मार्गे जाणारी बस उभी दिसली म्हणून शोभाबाई व हर्षल यांनी पाचोरा ते पिंपळगाव हरेश्र्वर बसमधून शिंदाड गावी आले. घरी आल्यावर दागदागिने कपाटात ठेवण्यासाठी त्यांनी दागदागिने ठेवलेली तपकिरी रंगाची पर्स हातात घेऊन कपाटात ठेवण्याआधी दागिन्यांची खात्री करुन घेण्यासाठी पर्स उघडून बघितली असता पर्समध्ये दागिने दिसून आले नाही. म्हणून शोभाबाई यांनी पर्स व सोबत असलेल्या सर्व सामानाची बारकाईने तपासणी केली परंतु दागिने मिळून न आल्याने आपले दागिने चोरीला गेल्याची खात्री झाली.
दागिने चोरीला गेल्याची खात्री झाल्यावर शोभाबाई यांनी त्वरित पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार सांगितला व अज्ञात व्यक्तीने साडे बावीस तोळे ७,८०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची तक्रार शोभाबाई यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिली असून या दिलेल्या तक्रारीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेश नरवाडे यांनी फिर्याद दाखल करुन घेतली असून या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिशेने भदाणे हे करीत आहेत.
चाळीसगाव बसस्थानकावर चोऱ्या करणारी महिला व पुरुषांची एक टोळी सक्रिय असून या टोळीतील महिला व पुरुष हे येणाऱ्या, जाणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवून अंगावर दागदागिने असलेल्या महिला किंवा ज्या महिलांजवळ किंमती दागदागिने व सामान असेल अशा महिलांचा पाठलाग करतात व गर्दीचा फायदा घेत त्या महिलेचा पाठलाग करत, करत एस. टी. बसमध्ये चढतात.
बसमध्ये चढल्यानंतर मुद्दामहून भांडण करुन या गर्दीत हातचलाखी करुन दागदागिने चोरुन घेतात व त्यांचा हाताला चोरीचा माल लागताच आम्ही चुकीच्या बसमध्ये बसलो किंवा आमचं पोरग खाली राहिल असा बहाणा करुन बसमधून खाली उतरुन फरार होतात अशी माहिती समोर येत असून या चोरांच्या टोळीला या बसस्थानकावर अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्रेते बुट पॉलिश व इतर व्यावसायीक यांना खबर देतात व चोरी केल्यावर चोरीचा माल फरार करण्यासाठी थोडेफार पैसे घेऊन मदत करत असतात अशी माहिती समोर येत आहे.