कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जाल. पाचोरा पोलीसांचा कडक इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२४
सद्यस्थितीत अपघाताची वाढती संख्या लक्षात घेऊन अपघाताची कारणे शोधून काढली असता अतिवेगाने वाहन पळवणे, रस्त्याची परिस्थिती व रहदारीच्या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या ठिकाणी अतिवेगाने वाहन पळवणे, नको असलेल्या ठिकाणी मुद्दामहून कर्कश हॉर्न वाजवणे, वाहनाला गरजेपेक्षा जास्त प्रखर लाईट बसवणे, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे, दुचाकीवर व चारचाकी वाहनात प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसवून बेदरकारपणे वाहन पळवणे, दुचाकीवर वेगवेगळ्या कसरती करत वाहन पळवणे डोक्यावर शिरस्त्राण नसणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होऊन जीवितहानी होत असल्याची बाब लक्षात आली आहे.
याची दखल घेत होणारे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ व पोलीस विभागामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर यांच्या आदेशानुसार व पाचोरा विभागाचे डी. वाय. एस. पी. धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना व ट्रॉफीक पोलीसांना सोबत घेत पाचोरा शहरासह तालुक्यात कारवाईला सुरुवात केली आहे.
या कारवाईत वाहन तपासणी करुन कागदपत्रे योग्य आहेत किंवा नाहीत ? वाहन चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही ? तसेच अतिवेगाने वाहन पळवणे, अल्पवयीन मुले वाहन चालवतांना आढळून आल्यास कारवाई करत पालकांना समज देणे, तीन सिट बसवून दुचाकी चालवणे, शिरस्त्राण नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे अशा बेशिस्त वाहनधारक रितसर कारवाया सुरु केल्या असून ही कारवाईची मोहीम राबविण्यासाठी पाचोरा शहरातील मुख्य चौकात व मुख्य रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून कारवाईला सुरुवात केली आहे.
तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये, रस्त्याची परिस्थिती पाहून व वर्दळीच्या ठिकाणी वाहन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने पळवू नये, गरज नसतांना तसेच शाळा, कालेज व दवाखान्याजवळ कर्कश हॉर्न वाजवू नये, तीन सिट बसवून दुचाकी चालवू नये, शक्य होईल तेवढे शिरस्त्राण वापरावे अशा सुचना केल्या असून वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन होणारे अपघात व जीवितहानी टाळावी व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.