वडगाव जोगे फाट्यावर भरदिवसा बिबट्याचे दर्शन, शेतकरीवर्गातून भीतीचे वातावरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२४
अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या वडगाव जोगे फाट्यावर दशरथ राठोड यांच्या लय भारी उपहारगृहाचे जवळच असलेल्या शेत शिवारात आज संध्याकाळी अंदाजे सहा वाजेच्या सुमारास दशरथ राठोड यांना बिबट्या दिसून आल्याने अंबे वडगाव, कोकडी तांडा, वडगाव जोगे, मालखेडा या परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
कारण अंबे वडगाव, मालखेडा, वडगाव जोगे, कोकडी तांडा, कळमसरा, कुऱ्हाड, लोहारा या गावापर्यंत मोठ्या प्रमाणात घनदाट राखीव आहे. यामुळे या जंगलात हरीण, रानडुक्कर, ससे, कोल्हे असे जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे आरते खाद्य उपलब्ध असल्याने या जंगलात मागील एक महिन्यापासून बिबट्याने तळ ठोकला असून रात्रभर जंगलात तर दिवसा शेत शिवारात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील कामे करण्यासाठी मजुर वर्ग कामावर येत नसल्याने शेतीची कामे खोळंबली असून रब्बी हंगामाला अडथळा निर्माण झाला आहे. म्हणून वनविभागाच्या वतीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.