अवैध धंदे करणारे व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघटन, जनहितार्थ आवाज उठवणाऱ्या समाजसेवकांचे होतेय मुंडन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२४
सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी व अवैध धंदे वाढल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मोठ्या शहरातच नव्हे तर आता ग्रामीण भागातही दररोज मारामाऱ्या, ठोकाठोक्या, चाकुहल्ला, भरचौकात गोळीबार, छेडखानी, फसवणूक, रस्ता लूट व छेडखानीच्या घटना घडत आहेत. या घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागते परंतु धरपकड केली जाते दोन दिवस बोंबाबोंब केली जाते मात्र मध्येच कुठेतरी मांजर आडवी जाते व थेट कारवाई केली जात नाही. यामुळे गुन्हेगारी करणारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यामुळे गुंडागर्दीची वाढती दहशत पाहून सर्वसामान्य माणसाची कुचंबणा होत असून दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडावे की नाही असा प्रश्न मनात निर्माण होत आहे. तसेच घरातील कर्ता पुरुष नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त घराबाहेर गेला असेल किंवा मुले, मुली शाळा, कॉलेजला गेली असतील तर ती सुखरुप घरी येईपर्यंत घरातील वडीलधाऱ्यांचा जीव भांड्यात पडत नाही.
ही गुंडागर्दी व अवैध धंदे वाढल्याने समाजातील सर्व घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहून आपणही समाजाचे काही देणे लागतो अशी भावना मनात घेऊन समाजहितासाठी काही समाजसेवक ही वाढती गुंडगिरी व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन व इतर महत्त्वाच्या अधिकारी वर्गाकडे अर्जफाटे करुन कारवाईची मागणी करत असतात.
परंतु अर्जफाटे केल्यावरही वाढती गुंडागर्दी व अवैध धंदे बंद होण्याऐवजी परत जोमाने चालतात व दररोज नवनवीन लोकांची वाढती संख्या वाढत्या गुन्हेगारीत व अवैध धंद्यात उतरतांना दिसून येते. तसेच हे गुंड लोक व अवैध धंदे करणारांना अर्जफाटे करणारांची नावे माहीत होतात मग हे गुंड लोक अर्जफाटे करणारांना हस्ते, परहस्ते तर कधी समोरासमोर भेटून दमदाटी करुन तर कधी मारपीट करुन जीवे मारायची धमकी देतात.
धमक्या मिळाल्यानंतर किंवा मारझोड झाल्यानंतर सर्वसामान्य माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला जाऊन घडलेला प्रकार सांगुन तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा (सगळ्याच नव्हे) तर बऱ्याचशा पोलीस स्टेशनला (सगळेच नव्ह परंतु काही) अधिकारी व कर्मचारी तक्रारदारांना तासंतास बसवून ठेवतात व जास्तच तगादा लावल्यावर एका कोऱ्या कागदावर तक्रार लिहून घेतात. तक्रार लिहून घेतली तरी मात्र आठवडा नव्हे तर महिना उलटून गेला तरी कारवाई केली जात नाही.
अशा प्रकारांमुळे गुंडागर्दी व अवैध धंदे करणारे निधड्या छातीने गल्लीबोळात, भरवस्तीत, ठिकठिकाणी, बिनधास्तपणे आपली गुंडगिरी व अवैध धंदे सुरु ठेवतात. तक्रारदार जर परत पोलीस स्टेशनला विचारणा करण्यासाठी गेला तर त्याला संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची अरेरावी ऐकून माघारी फिरावे लागते असा अनुभव येत आहे. यावरुन असेच लक्षात येते की गुंडगिरी व अवैध धंदे करणारे व (पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी) यांचे लागेबांधे असल्याने तसेच इमानेइतबारे काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कुठुनतरी राजकीय किंवा प्रतिष्ठितांकडून दबाव येत असल्याने या गुंडगिरी व अवैध धंदे करणारांवर कारवाई केली जात नाही.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी झटणारे जळगाव येथील दिपक कुमार गुप्ता यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यांनी याबाबत थेट मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच इतर जबाबदार मंत्री व अधिकाऱ्यांकडे इमेल द्वारा तक्रार केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील बऱ्याचशा जनहितार्थ काम करणारांना असाच अनुभव येत आहे. म्हणून जळगाव जिल्ह्यातील गुंडागर्दी व सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी इमानेइतबारे काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.