पंधराशेचा आकडा अजून एक लफडा, बांधकाम कामगारांना भांडी मिळवून देण्यासाठी दलालांची टोळी सक्रिय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१२/२०२४
[आपल्या गाव परिसरात जर असे दलाल सक्रिय असतील तर सत्यजित न्यूजला माहिती द्यावी आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, तसेच सत्यजित न्यूजच्या माध्यमातून रोखठोक बातम्यांसाठी सत्यजित न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा.]
नुकताच श्री. महालक्ष्मी एंटरप्राईजेसच्या नावाखाली भाग्यवान ग्राहक योजना अमलात आणून प्रत्येक भाग्यवान ग्राहकांकडून १५००/०० रुपये घेऊन ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस न देता ही लकी ड्रॉ योजना राबवणाऱ्या आयोजकांनी कोटी रुपये घेऊन पोबारा केल्याचा लफडा ताजा असतांनाच अजून एक लफडा समोर आला आहे. यामध्ये बांधकाम कामगारांना भांडी मिळवून देण्यासाठी काही दलालांनी बऱ्याचशा लोकांकडून १५००/०० रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासन आदेशानुसार इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहेत. हे गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप करतांना बांधकाम मजुरांचे हित लक्षात घेऊन कामानिमित्त भटकंती करणाऱ्या मजुरांसाठी नव्याने स्थलांतरित झालेल्या ठिकाणी निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यसेवा व भोजनाची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे दहा लाख नोंदणीकृत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी मोफत गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार बांधकाम कामगारांना ०४ ताट, ०८ वाट्या, ०४ पाण्याचे ग्लास, ०३ पातेले झाकणासह, ०१ मोठा चमचा (भात वाटपाकरीता), ०१ मोठा चमचा (वरण वाटपाकरीता), ०१ दोन लिटर पाण्याचा जग, ०१ मसाला ठेवण्यासाठीचा सात भाग असलेला डबा, ०१ १४ इंचीचा, एक १६ इंचीचा व एक १८ इंचीचा असे एकूण तीन झाकणासह डबे, ०१ परात, ०५ लिटर क्षमतेचा ०१ (स्टेनलेस स्टील) प्रेशर कुकर, ०१ स्टील कढई, ०१ झाकणासह स्टीलची मोठी टाकी, ०१ वगराळे अशा एकूण तीस भांड्यांचा संच वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे बांधकाम कामगारांसाठी ही योजना अमलात आणली असून याकरिता काही नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार या योजनेअंतर्गत भांडी मिळवून घेण्यासाठी बांधकाम कामगाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून संबंधित बांधकाम कामगार हा महाराष्ट्रातील १५ वर्षांपूर्वीचा रहिवासी असावा, तसेच संबंधित बांधकाम कामगाराने मागील एका वर्षभरात किमान ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम मजुर म्हणून काम केलेले असणे आवश्यक असून तो नोंदणीकृत बांधकाम कामगार व सद्यस्थितीत सक्रिय बांधकाम मजुर म्हणून नोंदणीकृत असेल तरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल अशी अट टाकण्यात आली आहे.
तसेच या योजनेअंतर्गत भांडी मिळवून घेण्यासाठी प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी), सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी) यांच्याकडे प्रत्येक बांधकाम कामगाराणे अर्ज करणे गरजेचे असून अर्ज करतांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र व बाधकामाचा पत्ता, कायमचा रहिवासी पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, बॅंक पासबुक झेरॉक्स, तीन पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र व मेल आयडी असल्यास मेल आयडी व सोबत घोषणापत्र असणे आवश्यक असून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल व अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच अर्ज केल्यानंतर भांडी मिळवून देण्यासाठीचा निर्णय योजनेचे समन्वयक अधिकारी (नोडल अधिकारी) यांच्याकडे राखुन ठेवलेला असतो.
अशी कडक नियमावली लागू असतांनाही संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विशेष करुन भडगाव व पाचोरा शहरांसह या दोघंही तालुक्यातील खेड्यापाड्यात काही पुरुष, महिला, तरुण, तरुणी तसेच काही वेगवेगळ्या गटाच्या महिला व काही मानधन तत्वावर काम करत असलेल्या महिलांची एक टोळी सक्रिय असून हे सगळे गावागावात, गल्लीबोळात फिरुन आम्ही तुम्हाला भांडी मिळवून देतो त्याबदल्यात तुम्ही आम्हाला १५००/०० रुपये व हवी असलेली कागदपत्रे द्या असे सांगून इच्छुक असलेल्या लोकांकडून १५००/०० रुपये घेऊन खोटे कागदपत्र तयार करुन शासनाच्या व लाभार्थ्यांच्या डोळ्यात धुळ फेक करत आहेत.
वास्तविक पाहता खऱ्याखुऱ्या बांधकाम कामगारांना एक रुपयाही न देता ही भांडी मोफत देण्यात येणार आहेत. तरीसुद्धा या योजनेतून भांडी मिळवून देण्यासाठी बागायतदार, सधन, श्रीमंत, नोकरी करत असलेल्या कुटुंबातील लोकांची कागदपत्रे घेऊन पैशांच्या जोरावर संबंधित व्यक्ती ही बांधकाम कामगार असल्याचे खोटे दाखले मिळवून घेत त्यांना बांधकाम कामगार दाखवून भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आजच्या घडीला मोफत भांडी मिळवून घेण्यासाठी बांधकाम कामगारांची संख्या पाहीली तर ती गावागावात हजारोंच्या संख्येने नोंद झाली असल्याचे लक्षात येते ही बांधकाम कामगारांची संख्या पाहून एक प्रश्न निर्माण होतो की जर इतक्या मोठ्या संख्येने बांधकाम कामगार असतील तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम कुठे सुरु आहे तसेच गावात जर १००० मजूर असतील तर त्या गावात १२०० ते १३०० बांधकाम कामगार असल्याची नोंद झाली असल्याचे दिसून येते मग यात काही प्रमाणात सधन कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे.
तसेच इतर शेती कामे, कारखाने, लहानमोठ्या दुकानातील मजूर व इतर ठिकाणी काम करणारांची संख्या लक्षात घेतली तर नक्कीच डोकं गरगरायला लागल्याशिवाय रहाणार नाही. म्हणून बांधकाम कामगारांची व बांधकाम कामगारांचे खोटे दस्तऐवज तयार करुन एका बाजुला सर्वसामान्य जनतेला मुर्ख बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या दलालांची सखोल चौकशी करुन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
कारण मागील वर्षी भडगाव येथे बांधकाम कामगारांना भांडी वाटत करण्यात आली होती तेथेही हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने बांधकाम मजूर भांडी घेण्यासाठी आले होते यावरुन या योजनेअंतर्गत किती मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होतोय याची कल्पना न केलेली बरी.
टीप ~ जळगाव जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या लाखोंच्या घरात गेली असून इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम कुठे सुरु आहे. व जर का बांधकाम कामगारांची संख्या लाखोंच्या घरात असेल तर मग जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारखान्यात, दवाखान्यात, मार्केट कमेटी, धान्य खरेदी मार्केट, वेगवेगळ्या व्यवसायिकांकडे काम करणारे महिला, पुरुष मजूर, शेतात काम करणारे मजूर यांच्या संख्येची आकडेमोड केली तर नक्कीच जळगाव जिल्ह्यात लोकसंख्येची आकडेवारी गगनाला भिडले हे मात्र नक्की.